प्रतिमा विटंबनेप्रकरणी ४५ आरोपींना कोठडी
By admin | Published: October 16, 2016 02:38 AM2016-10-16T02:38:45+5:302016-10-16T02:38:45+5:30
चांगेफळ पैसाळी ग्रामस्थांवर झाला होता हल्ला.
अकोला, दि. १५- बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुनर्वसित गाव असलेल्या सुकळी पैसाळी येथे फ्लेक्सद्वारे उभारलेल्या महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर या गावातील एका गटाने पुनर्वसित गाव असलेल्या चांगेफळ पैसाळी गावातील घरांवर सशस्त्र हल्ला करणार्या ४५ आरोपींना पोलिसांनी अटक केली. या आरोपींना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
चांगेफळ पैसाळी आणि सुकळी पैसाळी ही दोन्ही गावे पुनर्वसित असून, या दोन गावांच्या मध्ये केवळ एक रसता आहे. सुकळी पैसाळी येथील एका युवकाने या रस्त्यावर मांस विक्रीचे दुकान लावले; मात्र नवरात्रोत्सवात मांस विक्रीचे दुकान बंद ठेवावे, अशी मागणी चांगेफळ पैसाळी येथील महिलांनी केली. या कारणावरून दोन्ही गटांत गत १0 दिवसांपासून वाद सुरू झाले.
दोन गटांतील वादाची धुसफुस सुरूच असताना शुक्रवारी पहाटे महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या कारणावरून संतापलेल्या एका गावातील १00 ते १५0 पुरुष व महिलांच्या समुदायाने एका विशिष्ट गटातील घरांवर सशस्त्र हल्ला चढविला. दुसर्या गटातील ग्रामस्थ झोपेत असतानाच हा हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी महिला, पुरुष, लहाने मुले व वृद्धांना मारहाण केली. त्यानंतर घरातील साहित्यासह विद्युत मीटरसह घरासमोरील वाहनांची तोडफोड केली.
या घटनेमध्ये हल्लेखोरांनी महिलांच्या गळय़ातील सोन्याचे दागिनेही तसेच बहुतांश घरातील दागिने व रोख रक्कमही हल्लेखोरांनी लंपास केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बाश्रीटाकळी पोलीस लुटमारीसह दंगल घडविणे, मारहाणीचे गुन्हे दाखल करून ४५ आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सध्या गावात तणावपुर्ण शांतता आहे.
गावात शांतता, तगडा बंदोबस्त
सुकळी पैसाळी आणि चांगेफळ पैसाळी या दोन्ही गावांत तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरसीपी, क्यूआरटी आणि राज्य राखीव पोलीस दलाची तुकडीही गावात तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.
आरोपींची धरपकड सुरूच
चांगेफळ पैसाळी येथे घडलेल्या दंगलीतील आरोपींची धरपकड सुरूच आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात पहिल्याच दिवशी सिटी कोतवालीच ठाणेदार अनिल जुमळे, मूर्तिजापूरचे ठाणेदार गजानन पडघन यांनी तब्बल ४५ आरोपींना तातडीने अटक केली होती.
चांगेफळ पैसाळी आणि सुकळी पैसाळी या दोन्ही गावांत शांतता आहे. ४५ आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींची धरपकड सुरूच आहे. आणखी जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. कुणीही व्हॉट्स अँप किंवा इतर सोशल नेटवर्किंग साइटवरून चिथावणी देण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही व्हॉट्स अँप ग्रुपवर असा प्रकार आढळल्यास अँडमीनवर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्यात येईल.
- चंद्रकिशोर मीणा, पोलीस अधीक्षक, अकोला.