राज्यातील ४५ लाचखोरांची बडतर्फी नाहीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 09:33 AM2020-09-25T09:33:10+5:302020-09-25T09:33:31+5:30
४५ अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्याच विभागाने बडतर्फ न केल्याने हे लाचखोर शासनाच्या तिजोरीवर आजही डल्ला मारत असल्याची माहिती आहे.
- सचिन राऊत
अकोला : शासकीय कार्यालयात अडकलेले कामकाज करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. न्यायालयातही हे लाचखोर दोषी ठरले; मात्र त्यांच्याच विभागाने या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत त्यांना बडतर्फच केले नसल्याचे वास्तव आहे. राज्यातील आठ विभागातील सुमारे ४५ अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्याच विभागाने बडतर्फ न केल्याने हे लाचखोर शासनाच्या तिजोरीवर आजही डल्ला मारत असल्याची माहिती आहे.
राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात लाचखोरांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात येते. या लाचखोरांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर त्यांची अवैध संपत्ती, तसेच त्यांच्याविरुद्ध असलेल्या तक्रारी व अन्य प्रकरणांचा तपास करून लाचखोरांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यामधील ४५ लाचखोरांना न्यायालयाने दोषी ठरवित शिक्षा सुनावली आहे; मात्र त्यानंतरही या ४५ लाचखोर अधिकारी व कर्मचाºयांना बडतर्फ करण्यात दिरंगाई केल्याचे वास्तव आहे. ग्रामविकास विभाग म्हणजेच जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या सर्वाधिक म्हणजेच १० अधिकारी व कर्मचाºयांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली असतानाही या विभागाने या लाचखोरांना बडतर्फ केले नाही. यावरून त्यांचाच विभाग लाचखोर अधिकारी व कर्मचाºयांना पाठीशी घालत लाचखोरीचे समर्थन करीत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर महसूल, नोंदणी व भूमी अभिलेख या विभागातील ६ अधिकारी व कर्मचाºयांना लाच घेताना रंगेहात अटक केल्यानंतर त्यांना शिक्षा सुनावली आहे; मात्र त्यानंतरही संबंधित विभागाने या सहा लाचखोरांना बडतर्फ केले नाही. या पाठोपाठ पोलीस, कारागृह व होमगार्ड अशा पाच जणांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तर उद्या, ऊर्जा व एमआयडीसी या शासकीय कार्यालयातील पाच लाचखोरांना शिक्षा सुनावल्यानंतरही त्यांना बडतर्फ केले नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. राज्याच्या आठही विभागातील लाचखोर अधिकारी व कर्मचाºयांचा यामध्ये समावेश आहे.
विभागनिहाय लाचखोरांची संख्या
मुंबई ०३
ठाणे ०४
पुणे ००
नाशिक ०८
नागपूर १०
अमरावती ०२
औरंगाबाद ०५
नांदेड १३
-------------------
एकूण ४५
----------------------------------
विभागातील अधिक लाचखोर
जिल्हा परिषद, पंचायत समिती, महसूल, नगरविकास, उद्योग, ऊर्जा, एमआयडीसी, भूमी अभिलेख, पोलीस, कारागृह व होमगार्ड या विभागातील शिक्षा झालेल्या लाचखोरांचा सहभाग आहे.