५0 दिवसांपासून रखडली ४५० ट्रॅक्टर तुरीची मोजणी!
By admin | Published: April 6, 2017 01:19 AM2017-04-06T01:19:27+5:302017-04-06T01:19:27+5:30
अकोला- दीड महिन्यांपासून ४५० ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप अडकले आहे. जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाच्या दिवसांत तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.
शेतकऱ्यांना हेलपाटे : बाजार समितीत वाहने मोजमापाच्या प्रतीक्षेत
संतोष येलकर - अकोला
नाफेडद्वारे सुरू असलेल्या तूर खरेदीत जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रांवर हजारो क्विंटल तुरीचे मोजमाप रखडले आहे. त्यामध्ये अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दीड महिन्यांपासून ४५० ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप अडकले आहे. मोजमापाच्या प्रतीक्षेत ट्रॅक्टर उभे असल्याने, जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाच्या दिवसांत तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या एका खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्यात येत असून, अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा या चार ठिकाणी खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येत आहे. खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, त्या तुलनेत तूर खरेदीची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. बारदान्याचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या असल्याने तूर खरेदीत वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने, खरेदी केंद्रांवर तुरीच्या मोजमापासाठी प्रचंड विलंब लागत आहे. खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी आणलेल्या तुरीच्या मोजमापासाठी शेतकऱ्यांना एक-दीड महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत २४ फेबु्रवारी नोंदणी झालेल्या ४५० ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप ५ एप्रिल रोजी होऊ शकले नाही. त्यामुळे गत दीड महिन्यांपासून बाजार समिती परिसरात तुरीचे ४५० ट्रॅक्टर मोजमापाच्या प्रतीक्षेत उभे आहेत. प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये जवळपास ५० क्विंटलप्रमाणे ४५० ट्रॅक्टरमधील २३ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप रखडल्याने, जीवाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाच्या दिवसांत तुरीचे मोजमाप होणार तरी केव्हा, याबाबत प्रतीक्षा करीत शेतकऱ्यांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.
मोजमापाला विलंब; शेतकऱ्यांना भुर्दंड!
अकोला बाजार समितीमध्ये तूर खरेदी केंद्रांवर गत २४ फेबु्रवारीपासून ४५० ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे गत दीड महिन्यांपासून बाजार समिती आवारात तुरीचे ट्रॅक्टर उभे आहेत. प्रतिदिवस ५०० रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे भाडे द्यावे लागते. त्यामुळे तुरीच्या मोजमापाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
राखण करीत शेतकऱ्यांना काढावी लागते दिवस-रात्र!
खरेदी केंद्रावर एक ते दीड महिना तुरीचे मोजमाप होत नसल्याने, मोजमापाच्या प्रतीक्षेत कामधंदा सोडून शेतकऱ्यांना तुरीच्या टॅ्रक्टरजवळच रात्रंदिवस काढावा लागत आहे. विक्रीसाठी आणलेल्या तुरीचे राखण करीत दोन वेळच्या जेवणासह अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
‘नाफेड’द्वारे तूर खरेदीला प्रचंड विलंब होत असल्याने, शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत न पाहता तूर खरेदीची गती वाढली पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेली उपाययोजना करून तुरीचे तातडीने मोजमाप करण्याची गरज आहे. सुटीच्या दिवशीही तूर खरेदी सुरू ठेवली पाहिजे.
- शिरीष धोत्रे, सभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती.