वर्षभरात ४५१ नवजात बालकांचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:25 AM2017-10-25T01:25:17+5:302017-10-25T01:25:39+5:30
अकोला : संपूर्ण जिल्हय़ासह लगतच्या जिल्हय़ांमधील गर्भवती स्त्रियांसाठी आधार ठरलेल्या येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील विशेष नवजात शिशू दक्षता कक्ष (एसएनसीयू)मध्ये एप्रिल २0१६ ते मार्च २0१७ या एका वर्षाच्या कालावधीत दाखल झालेल्या ४१५२ नवजात बालकांपैकी ४५१ बालके दगावल्याची माहिती समोर आली आहे.
अतुल जयस्वाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : संपूर्ण जिल्हय़ासह लगतच्या जिल्हय़ांमधील गर्भवती स्त्रियांसाठी आधार ठरलेल्या येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील विशेष नवजात शिशू दक्षता कक्ष (एसएनसीयू)मध्ये एप्रिल २0१६ ते मार्च २0१७ या एका वर्षाच्या कालावधीत दाखल झालेल्या ४१५२ नवजात बालकांपैकी ४५१ बालके दगावल्याची माहिती समोर आली आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बालकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकाराची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेऊन राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
‘लेडी हार्डिंग’ म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा स्त्री रुग्णालयात केवळ जिल्हाच नव्हे, तर लगतच्या वाशिम, बुलडाणा, हिंगोली व अमरावती जिल्हय़ातूनही अनेक गर्भवती महिला प्रसूतीसाठी येतात. दिवसेंदिवस येथे प्रसूतीसाठी येणार्या महिलांचे प्रमाण वाढतच असले, तरी त्यादृष्टीने येथील सोयी- सुविधांचा म्हणावा तसा विकास झाला नाही. या रुग्णालयात विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या बालकांसाठी वर्ष २0१३ मध्ये विशेष नवजात शिशू दक्षता कक्ष (एसएनसीयू)ची स्थापना करण्यात आली. तब्बल ४८ एन्क्युबेटर असलेले ये थील ‘एसएनसीयू’ हे राज्यातील एकूण ३६ एसएनसीयूमध्ये सर्वात मोठे आहे. येथील एसएनसीयूमध्ये दर महिन्याला मोठय़ा संख्येने आजारी बालकांना दाखल करून घेतले जाते. एप्रिल २0१६ ते मार्च २0१७ या एका वर्षाच्या कालावधीत या रुग्णालयात एकूण १५९८४ बालकांनी जन्म घेतल्याची नोंद आहे.
यापैकी ४१५२ बालकांना ‘एसएनसीयू’मध्ये ठेवावे लागले. या बालकांपैकी ४५१ बालकांना वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले. येथे येणारी नवजात बालके कमी दिवसांची, कमी वजनाची किंवा संसर्ग झालेली असतात, त्यामुळे या एसएनसीयूची स्थापना झाल्यापासूनचा मृत्यूदर वाढताच आहे.
येथील एसएनसीयूसाठी ४0 परिसेविकांची गरज असताना येथे फक्त २४ परिसेविका आहेत.
‘एसएनसीयू’चा मृत्यूदर १0.८६ टक्के
जिल्हा स्त्री रुग्णालयात अतिजोखमीच्या माता प्रसूतीसाठी येता त. या मातांच्या बालकांना ‘एसएनसीयू’मध्ये ठेवण्याची गरज असते. तसेच इतर ठिकाणांहून येथे दाखल करण्यात येणारी बालकेही अत्यंत गंभीर अवस्थेत असतात. त्यामुळे एसएनसीयूचा मृत्यूदर हा नेहमीच जास्त राहतो. स्त्री रुग्णालया तील एसएनसीयूचा मृत्यूदर १८ टक्क्यांवरून १0.८६ टक्क्यां पर्यंत खाली आणण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आल्याचा दावा वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी केला आहे.
मानवाधिकार आयोगाने बजावली राज्य शासनाला नोटीस
अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये वर्षभरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नवजात शिशूंचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी करून सहा आठवड्यांच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ‘अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेल्या अनेक नवजात बालकांच्या मृत्यूबाबतच्या बातम्यांची आपण स्वत:हून दखल घेतलेली आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बालकांचा मृत्यू होणे हे राज्य सरकार, रुग्णालय व्यवस्थापन आणि संबंधित विभागाच्या निष्काळजीपणाचे निदर्शक आहे. हे नवजात बालके आणि त्यांच्या कुटुंबांच्या मानवाधिकाराचे गंभीर उल्लंघन केल्यासारखेच आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने ठरावीक मुदतीत चौकशी करणे आवश्यक आहे’, असे आयोगाने म्हटले आहे.
‘एसएनसीयू’चा मृत्यूदर कमी करण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करीत असून, गत चार वर्षांत हा दर कमी करण्यात आम्ही यश मिळविले आहे. आमच्या ‘एसएनसीयू’मधील बालकांचा मृत्यूदर सामान्य आहे. याबाबत राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे; परंतु आतापर्यंत ही नोटीस आम्हाला प्राप्त झाली नाही.
- डॉ. आरती कुलवाल,
वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.