उर्दू माध्यमाच्या ४६ अतिरिक्त शिक्षकांचे मनपा, नगर परिषद शाळांमध्ये समायोजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:47 PM2018-12-26T12:47:02+5:302018-12-26T12:47:09+5:30
अकोला: जिल्ह्यात उर्दू माध्यमाची एकही जागा रिक्त नसल्यामुळे ४६ अतिरिक्त शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्यात आले.
अकोला: जिल्ह्यात उर्दू माध्यमाची एकही जागा रिक्त नसल्यामुळे ४६ अतिरिक्त शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्यात आले. मंगळवारी उपसंचालक स्तरावर या सर्व शिक्षकांचे महापालिका, नगर परिषदेच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. यातील अनेक शिक्षकांचे शेगाव, नांदुरा नगर परिषद शाळांमधील रिक्त पदांवर समायोजन झाले.
जिल्ह्यातील उर्दू माध्यमांचे खासगी अनुदानित शाळांमधील ६२ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यापैकी तीन शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन करण्यात आल्यानंतर उर्वरित शिक्षकही सेवाज्येष्ठतेमुळे अतिरिक्त यादीतून कमी झाल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या ४६ वर आली. तीन रिक्त जागा वगळता जिल्ह्यातील इतर खासगी उर्दू शाळांमध्ये एकही पद रिक्त नसल्यामुळे ४६ शिक्षकांचे समायोजन करावे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. उर्दू शिक्षकांना जिल्ह्यातच समायोजन करण्याची अपेक्षा होती; परंतु जागाच नसल्यामुळे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी ४६ उर्दू शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे पाठविले. त्यांच्या नावांची यादी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविल्यानंतर मंगळवारी शिक्षण उपसंचालक पेंदोर यांनी शिक्षणाधिकारी मुकुंद यांच्या उपस्थितीत अकोला जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातील नगर परिषदेच्या उर्दू शाळांमध्ये समायोजन केले. यातील काही अतिरिक्त शिक्षकांचे महापालिकेच्या उर्दू शाळांमधील रिक्त पदांवर तर काहींचे बाळापूर, अकोट, मूर्तिजापूर नगर परिषद उर्दू शाळांसोबत बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा नगर परिषदेच्या उर्दू शाळांमध्ये समायोजन केले. यात शेगाव व नांदुरा येथील शाळा मिळाल्यामुळे जिल्ह्यातील उर्दू शिक्षक खिन्न झाले आहेत. अकोल्यातून त्यांनी तालुक्यांसह बाहेरील जिल्ह्यात अप-डाउन करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील ४६ अतिरिक्त उर्दू शिक्षकांचे १00 टक्के समायोजन केल्याचे समायोजन आहे. खासगी अनुदानित उर्दू शाळांमध्ये रिक्त पदे नसल्यामुळे अतिरिक्त उर्दू शिक्षकांचे जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर समायोजन करावे लागले. या शिक्षकांना लवकरच शाळांमध्ये रुजू होण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक स्तरावरून देण्यात येतील.
-प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी
माध्यमिक.