बोगस कापूस बियाण्याचे ४७ पाकीटे जप्त! अकोट तालुक्यातील उमरा येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
By रवी दामोदर | Published: May 30, 2024 11:09 AM2024-05-30T11:09:40+5:302024-05-30T11:10:46+5:30
याप्रकरणी अकोट पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला: खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकरी पेरणीसाठी बी - बियाणे खरेदीत व्यस्त आहे. अशातच जिल्ह्यात कापसाचे बोगस बियाणे जप्त केल्याची कारवाई उघडकीस आली आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने अकोट तालुक्यातील उमरा येथे बोगस कापूस बियाण्याचे ४७ पाकिटे जप्त केली आहेत. याप्रकरणी अकोट पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकातील जिल्हा मोहीम अधिकारी महेंद्रकुमार सालखे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतिशकुमार दांडगे, तेल्हारा पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरत चव्हाण व अकोट ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने दि. २९ मे रोजी दुपारच्या सुमारास उमरा येथे छापा टाकला असता निर्मल दिलीपसिंग तोमर (ठाकूर ) (रा. उमरा, ता. अकोट, जि. अकोला) यांच्या शेतातील मोडकळीस आलेल्या घरात बोगस कापुस बियाण्याचे एकूण ४७ पाकिटे, असा ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जिल्हा मोहीम अधिकारी महेंद्र सालखे यांनी अकोट ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून निर्मल दिलीपसिंग तोमर (ठाकूर ) (रा. उमरा, ता. अकोट ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.