४७ हजार लोकांची तहान टँकरवर!

By admin | Published: July 6, 2016 02:31 AM2016-07-06T02:31:01+5:302016-07-06T03:09:07+5:30

खारपाणपट्टयातील ४३ गावांमध्ये २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच!

47 thousand people thirsty tanker! | ४७ हजार लोकांची तहान टँकरवर!

४७ हजार लोकांची तहान टँकरवर!

Next

संतोष येलकर / अकोला
पावसाळा सुरू होऊन महिना उलटून गेला असला तरी, जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ४३ गावांमध्ये २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे. त्यामुळे पावसाळ्यातही या गावांमधील ४७ हजार ३0६ ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.
अकोला शहरासह अकोला तालुक्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या स्थितीत गत नोव्हेंबरपासून काटेपूर्णा धरणातून ६४ गावांना पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, धरणातील जलसाठा अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आला. त्यामुळे पर्यायी उपाययोजना म्हणून ६४ गावांना गत एप्रिल अखेरपर्यंत सुकळी तलावातून पाणीपुरवठा करण्यात आला. सुकळी येथील तलाव आटल्यानंतर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार गत मे महिन्यापासून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ५५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन महिना उलटून गेला. गत १५ दिवसात पाऊस अधून-मधून हजेरी लावत असल्याने, जिल्हय़ातील काही भागात आटलेले नदी-नाले वाहू लागले; परंतु सार्वत्रिक दमदार पावसाअभावी जिल्हय़ातील धरणांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पावसाळ्यातही जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ४३ गावांना १ शासकीय व २५ खासगी अशा एकूण २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Web Title: 47 thousand people thirsty tanker!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.