४.८0 कोटींची होणार विकास कामे
By admin | Published: February 24, 2016 01:54 AM2016-02-24T01:54:10+5:302016-02-24T01:54:10+5:30
अकोला शहरात चार कोटी ८0 लाख रुपयांच्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
अकोला: प्रभागातील विकास कामांसाठी मनपाला मूलभूत सुविधा अंतर्गत प्राप्त २ कोटी ४0 लाखाच्या प्रस्तावाला मंगळवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी मंजुरी दिली. या निधीत मनपाने उर्वरित ५0 टक्के हिस्सा जमा केल्यामुळे शहरात चार कोटी ८0 लाख रुपयांच्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी शासनाकडून मनपाला कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत १0 कोटी ९५ लाख रुपये, सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत २ कोटी ५0 लाख, दलितेतर योजनेंतर्गत ३ कोटी २३ लाख आणि मूलभूत सुविधेंतर्गत २ कोटी ४0 लाख रुपये मनपाला प्राप्त झाले. मनपाच्या बांधकाम विभागाने जिल्हाधिकार्यांकडे पाठवलेल्या नागरी दलित वस्ती सुधार योजना आणि दलितेतर योजनेच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. त्यापाठोपाठ २ कोटी ४0 लाखाचा मूलभूत सुविधांचा प्रस्तावसुद्धा जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात आला. या निधीमध्ये मनपाला उर्वरित ५0 टक्के आर्थिक हिस्सा जमा करणे भाग होते. त्यानुसार मनपानेसुद्धा उर्वरित हिस्सा जमा केला. या प्रस्तावाला जिल्हाधिकार्यांच्या मंजुरीनंतर विभागीय आयुक्तांच्या प्रशासकीय मंजुरीची प्रतीक्षा होती. मंगळवारी अचानक विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर अकोल्यात दाखल झाले असता जिल्हाधिकारी जी. श्रीकांत,मनपा आयुक्त अजय लहाने यांनी मूलभूत सुविधेचा प्रस्ताव सादर केला. क्षणाचाही विलंब न लावता विभागीय आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. यादरम्यान, सर्वपक्षीय नगरसेवकांच्या भूमिकेमुळे सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेचा प्रस्ताव अद्यापही तयार होऊ शकला नाही. हा प्रस्ताव कधी तयार होतो, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.