सहा दिवसांत फवारणीतून विषबाधेचे ४९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:25 PM2019-09-09T12:25:34+5:302019-09-09T12:25:43+5:30
सर्वोपचार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे.
- प्रवीण खेते
अकोला : जिल्ह्यात गत महिन्यात १५० पेक्षा जास्त शेतकरी व शेतमजुरांना फवारणीतून विषबाधा झाली होती. विषबाधेचे हे सत्र सुरूच असून, सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सर्वाेपचार रुग्णालयात विषबाधेचे ७४ रुग्ण दाखल झालेत. त्यापैकी ४९ रुग्ण हे फवारणीतून विषबाधा झालेले आहेत. सर्वोपचार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे.
सर्वोपचार रुग्णालयात दररोज १० ते १२ विषबाधेचे रुग्ण दाखल होतात. धक्कादायक बाब म्हणजे, यातील सात ते आठ रुग्ण हे फवारणीतून विषबाधेचे आहेत. हे सत्र गत महिन्यापासून सुरू असून, आतापर्यंत २०० पेक्षा जास्त रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील बहुतांश रुग्णांना ‘मोनोक्रोटोफॉस’ या प्रतिबंधित कीटकनाशकाच्या फवारणीतून झाल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे; परंतु या रुग्णांवर उपचारासाठी आरोग्य यंत्रणा तोकडी ठरत आहे. एकीकडे मनुष्यबळाची समस्या, तर दुसरीकडे उपलब्ध खाटांची समस्या. त्यामुळे जागा मिळेल तिथे या रुग्णांना ठेवण्यात येत आहे. सध्या सर्वोपचार रुग्णालयात ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहे; परंतु दररोज येणाºया रुग्णांची संख्या पाहता आरोग्य यंत्रणा अपुरी ठरणार असल्याचे संकेत गत काही दिवसांच्या कामकाजातून दिसून येत आहेत.
‘मोनोक्रोटोफॉस’ची सर्रास विक्री
‘मोनोक्रोटोफॉस’ हे प्रतिबंधित कीटकनाशक असून, त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या जीवावर होत आहे. महिनाभरात तीन शेतकºयांना या कीटकनाशकामुळे जीव गमवावा लागला. असे असले, तरी या कीटकनाशकाची विक्री सर्रास सुरू आहे.
असा आहे गत सहा दिवसांचा आढावा
तारीख विषबाधेचे एकूण रुग्ण - फवारणीतून विषबाधेचे रुग्ण
१ सप्टेंबर - १३ ८
२ सप्टेंबर १६ १०
३ सप्टेंबर ९ ७
४ सप्टेंबर ५ २
५ सप्टेंबर १३ १०
६ सप्टेंबर १८ १२