४९२ उमेदवारांवर होणार कारवाई!
By admin | Published: February 22, 2016 02:21 AM2016-02-22T02:21:29+5:302016-02-22T02:21:29+5:30
अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर केला नाही; निवडणूक लढण्यास ठरणार अपात्र
संतोष येलकर / अकोला
सहा महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढविलेल्या उमेदवारांपैकी ४९२ उमेदवारांनी अद्यापही निवडणूक खर्च सादर केला नाही. निवडणूक खर्चाचे विवरणपत्र सादर न करणार्या या उमेदवारांवर पाच वर्षांंसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येणार असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे.
गत ऑगस्ट २0१५ मध्ये जिल्ह्यात २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणूक निकालानंतर, दोन महिन्यांच्या आत (६0 दिवस) निवडणूक खर्चाचे विवरणपत्र संबंधित तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर, उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चाचा अहवाल सादर करण्याचा आदेश, उपजिल्हाधिकारी (ग्रामपंचायत निवडणूक) मार्फत जिल्ह्यातील सातही तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकार्यांना देण्यात आला होता.
या पृष्ठभूमीवर यासंदर्भात जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सात तहसील कार्यालयामार्फ त जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढविलेल्या एकूण उमेदवारांपैकी ४९२ उमेदवारांनी अद्यापही निवडणूक खर्चाचे विवरणपत्र सादर केले नाही. निवडणुकीचा खर्च सादर न करणार्या या उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागामार्फत तयारी सुरू करण्यात आली आहे.