पाणीटंचाई निवारणाच्या कामांसाठी ५ कोटीचा निधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 01:56 PM2019-11-26T13:56:30+5:302019-11-26T13:56:30+5:30
उपलब्ध निधीतून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या कामांची थकीत देयके अदा करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी गत उन्हाळ्यात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी ४ कोटी ९९ लाख ३० हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत २२ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या कामांची थकीत देयके अदा करण्यात येणार आहेत.
२०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांची कामे करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने नवीन विंधन विहिरी, कूपनलिका, तात्पुरत्या पूरक नळ योजना, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, खासगी विहिरींचे अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा इत्यादी कामांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी १४ कोटी ३६ लाख ३२ हजार रुपये निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी यापूर्वी ८ कोटी ८१ लाख ७४ हजार रुपयांचा निधी शासनामार्फत जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. त्यानंतर ४ कोटी ९९ लाख ३० हजार रुपयांचा निधी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत २२ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून जिल्हा परिषदमार्फत जिल्ह्यात करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारण उपाययोजनांच्या कामांची थकीत देयके अदा करण्यात येणार आहेत.
उपाययोजनानिहाय कामांचा असा प्राप्त झाला निधी !
जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी ४ कोटी ९९ लाख ३० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यामध्ये नवीन विंधन विहिरी व कूपनलिका -७८ लाख ५४ हजार रुपये, तात्पुरत्या पूरक नळ योजना -६५ लाख ७० हजार रुपये, नळ योजना विशेष दुरुस्ती -१ कोटी ४४ लाख रुपये, खासगी विहिरींचे अधिग्रहण -८६ लाख ८२ हजार रुपये आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या कामाचा खर्च भागविण्यासाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.