संपर्क तुटलेल्या दोनवाड्यातून गर्भवतीसह ५ रुग्णांना हलविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:23 AM2021-09-09T04:23:52+5:302021-09-09T04:23:52+5:30
रवी दामोदर अकोला : जिल्ह्यात सोमवार, मंगळवारी पाऊस मुसळधार झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. अकोला तालुक्यातील दोनवाडा येथे पुराच्या ...
रवी दामोदर
अकोला : जिल्ह्यात सोमवार, मंगळवारी पाऊस मुसळधार झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. अकोला तालुक्यातील दोनवाडा येथे पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने गावाचा संपर्क तुटला होता. त्यामुळे गावात रुग्ण अडकून पडले होते. एसडीआरएफच्या पथकाने बोटीच्या सहाय्याने गर्भवती महिलेसह पाच रुग्णांना सुरक्षित हलविले. त्यानंतर आपातापा आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिकेने त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले.
अकोला तालुक्यातील दोनवाडा गावाला पुराचा वेढा पडला आहे. गावाच्या एकीकडून पूर्णा नदी, तर दुसरीकडून कोलारचा नाला वाहतो. जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून अतिवृष्टी सदृश पाऊस होत असल्याने पूर्णा नदी व कोलारच्या नाल्याला पूर आला आहे. संपूर्ण गावाला जवळपास एक किलोमीटर पर्यंत पुराचा वेढा पडला आहे. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीसाठी नागपूर येथील एसडीआरएफ पथक तैनात केले आहे. पथक हे नागरिकांसाठी देवदूत ठरले असून, पथकाने बोटीच्या साहाय्याने गावातील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. यामध्ये गर्भवती महिला प्रीती निवृत्ती गायकवाड यांच्यासह वैभव गजानन बचे (२६) तसेच तीन इमर्जन्सी रुग्णांना हलविले. यासाठी पथकास तलाठी सुनील कल्ले व हरिहर निमकंडेसह स्थानिक युवकांनी मदत केली.
-----------------
एसडीआरएफ पथकात यांचा समावेश
जिल्ह्यातील पूर परिस्थिती हाताळण्यासाठी नागपूर येथील एसडीआरएफचे पथक सकाळी जिल्ह्यात दाखल झाले होते. तहसीलदार बळवंत अरखराव तसेच डीडीएमओचे संदीप सावळे यांच्यासोबत पीएसआय उद्धव केंद्रे यांच्या मार्गदर्शनात १० पोलीस अंमलदार यांनी दोनवाडा येथे धाव घेऊन नागरिकांसह रुग्णांना सुरक्षित स्थळे हलविले. पथकात किरण डेकाटे, पवन धुळे, कमलेश समरीत, दीपक कुलाळ, टोपेंद्र ढोमणे, ओम शेंडे, कुणाल हिवरकर, चालक संभाजी इंगळे, आर. एम. पाटील, जी. ए. मुंडे यांचा समावेश होता.