पाच पदव्युत्तर विद्याशाखांना मान्यता मिळवून देणार!
By Admin | Published: February 25, 2017 02:17 AM2017-02-25T02:17:38+5:302017-02-25T02:17:38+5:30
अधिष्ठाता डावर यांचे प्रतिपादन; मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची चमू येणार असल्याची माहिती.
अकोला, दि. २४- अकोल्याला लवकरच भारतीय वैद्यकीय परिषदेची चमू येण्याची शक्यता असून, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संशोधन अभवृद्धीस प्राधान्य देऊन, वैद्यकीय महाविद्यालयातील पाच पदव्यूत्तर विद्याशाखांना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची अधिकृत मान्यता मिळविण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. त्यासाठीची तयारी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. रेखा डावर यांनी सुरू केली आहे.
अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन इमारत, प्राध्यापकांची कमतरता, रुग्ण उपचारासाठी खाटांची कमी संख्या आणि संशोधनाची कमी इत्यादी उणिवा असून, त्यामुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयातील चार विद्याशाखांना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची अधिकृत मान्यता मिळविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे उपरोक्त बाबींची पूर्तता करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत.
यासंदर्भात डॉ. डावर यांनी खास ह्यलोकमतह्णशी बोलताना वैद्यकीय क्षेत्राशी निगडित अनेक विषयांची माहिती दिली. सद्यस्थितीत अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयातील पाच विद्याशाखांना अद्याप मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची अधिकृत मान्यता मिळाली नाही. यामध्ये शरीरशास्त्र, औषधशास्त्र, शस्त्रक्रीया, बालरोगशास्त्र तथा रेडीओलॉजी आदी शाखांचा समावेश आहे.
२0१४ पासून जे. जे. हॉस्पिटलने एचआयव्हीग्रस्त गर्भवती मातांपासून एचआयव्हीमुक्त बालकांचा जन्म देण्यात यश मिळविले असून, तेव्हापासून एचआयव्हीग्रस्त मातांपासून एचआयव्हीग्रस्त बाळ जन्मले नसल्याचे त्यांनी सांगितले. नवजात अर्भकांना एड्स संक्रमण टाळण्यासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून मोफत औषधांचा पुरवठा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, माता व बाल आरोग्य संगोपन हा त्यांच्या संशोधनाचा विषय राहिला असून, त्यांनी महिला गर्भनिरोधक लस निर्माण केली आहे. डॉ. डावर यांनी यापूर्वी मुंबई येथील जे. जे. हास्पिटल स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. एचआयव्ही संसर्गग्रस्त गर्भवती मातापासून होणारी मुले निकोप व्हावी, यादृष्टीने त्यांनी संशोधन केले असून, संसर्गग्रस्त मातांचा मुद्दा प्राधान्यक्रमाने घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.