५0 लाखांच्या ‘आरसीएच’ घोटाळय़ाचा ‘एसीबी’कडून तपास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:12 AM2017-11-16T02:12:22+5:302017-11-16T02:19:38+5:30
मनपाच्या आरसीएच कार्यालयामध्ये २00४ ते २0१0 या कालावधीत आरोग्य योजनेमध्ये ५0 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजला होता. नगरविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार घोटाळय़ाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तपास सुरू केला असून एसीबीने मनपाच्या आरसीएच कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राष्ट्रीय एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण योजना (आरसीएच) अंतर्गत मुले आणि महिलांसाठी आरोग्यासंदर्भात विविध उपक्रम राबविण्यात येतात. मनपाच्या आरसीएच कार्यालयामध्ये २00४ ते २0१0 या कालावधीत आरोग्य योजनेमध्ये ५0 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजला होता. नगरविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार घोटाळय़ाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तपास सुरू केला असून एसीबीने मनपाच्या आरसीएच कार्यालयातील महत्त्वाचे दस्तावेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
मनपा आरसीएच कार्यालयातील घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर या घोटाळय़ात महापालिकेच्या काही अधिकार्यांचासुद्धा समावेश असल्याची शक्यता वर्तविली होती. आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोटाळय़ाचा तपास सुरू केल्यामुळे मनपा वतरुळाचे लक्ष वेधल्या गेले आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून राष्ट्रीय एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण योजनेसाठी नियमित लसीकरण, जननी सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण योजना, पल्स पोलिओ मोहीम आदी उपक्रमांसाठी लाखो रुपयांचे अनुदान प्राप्त होते. २00४ ते २0१0 या कालावधीत आरसीएच कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी अनुदानाच्या रकमेत अपहार केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींनुसार २0१३ मध्ये विधानसभेत आरसीएच घोटाळय़ावर चर्चा झाली. त्यानंतर नगरविकास मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, विभागीय आयुक्तांना या प्रकरणात अहवाल सादर करण्यास सांगितले होते. विभागीय आयुक्तांनी १६ आरोग्य योजनांपैकी आठ योजनांमधील अनुदानाची तपासणी करून अहवाल राज्य शासनाकडे पाठविला. अहवालात लसीकरण, जननी सुरक्षा योजना, कुटुंब नियोजन, पल्स पोलिओ डोस ११ लाख ७0 हजार, कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत १३ लाख ४७ हजार वाहन भाड्यासंदर्भात ४ लाख २0 हजार आणि हजेरी रजिस्टर व मे. मुंदडा एजन्सीला १ लाख ५७ हजार, धनादेश अदा करण्यासाठी ४१ हजार रुपये, तसेच अग्रिम रक्कम देण्यासंदर्भात १0 लाख ४७ हजार रुपये, कृती प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी ए.सी.एम.सी. मॅनेजमेंट पुणे यांना दिलेल्या कंत्राटसंदर्भात ४ लाख १८ हजार रुपये आणि संगणक खरेदी व्यवहारात ३ लाख ८९ हजार रुपये असे एकूण ४९ लाख ८९ हजार रुपयांच्या खर्चाबाबत संशय व्यक्त केला.
यांच्या कार्यकाळात झाला गैरप्रकार
मनपाच्या आरसीएच कार्यक्रमांतर्गत २00४ ते २0१0 या कालावधीत झालेल्या गैरप्रकाराची जबाबदारी चार अधिकार्यांची आहे. या कालावधीत हे चार अधिकार्यांकडे मनपा आरोग्य अधिकारी पदाची जबाबदारी होती. त्यांच्या कार्यकाळात हा गैरप्रकार घडला. यात डॉ. उज्ज्वल कराळे (१ एप्रिल २00४ ते ३१ मार्च २00९), डॉ. छाया देशमुख (१ एप्रिल २00९ ते १ सप्टेंबर २00९), डॉ. अस्मिता पाठक (२ सप्टेंबर २00९ ते २५ जुलै २0१0) पर्यंत आणि डॉ. प्रभाकर मुद्गल (२६ जुलै २0१0 ते ६ ऑक्टोबर २0११) पर्यंत आरोग्य अधिकारी म्हणून जबाबदारी होती. या चार अधिकार्यांच्या कार्यकाळात विविध आरोग्य योजनेंतर्गत ५0 लाख रुपयांच्या खर्च झालेल्या अनुदानाच्या रकमेत घोळ असल्याचे दिसून आले आहे. नगरविकास मंत्रालयाच्या आदेशानुसार एसीबीचे अधिकारी दोन दिवसांपासून घोटाळय़ाशी संबंधित दस्तावेजांची तपासणी करीत असल्याने मनपा वतरुळात खळबळ उडाली आहे.
-