दुर्धर आजार रुग्णांसाठी ५० लाखांची योजना
By admin | Published: April 19, 2017 01:46 AM2017-04-19T01:46:22+5:302017-04-19T01:46:22+5:30
अकोला- जिल्ह्यातील दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी योजना राबविण्याचा ठराव जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत मंगळवारी मंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभेत ठराव
अकोला : दुर्धर आजार रुग्णांना आर्थिक मदत योजनेंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी ५० लाख रुपयांची योजना राबविण्याचा ठराव जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत मंगळवारी मंजूर करण्यात आला.
दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी ५० लाखांच्या योजनेला मंजुरी देत, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील दुर्धर आजाराच्या रुग्णांना मदत देण्याचे निर्देश या सभेत देण्यात आले. समितीच्या मागील सभेच्या इतिवृत्ताला या सभेत मंजुरी देण्यात आली, तसेच बाळापूर तालुक्यातील उरळ येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय बाळापूर येथे तालुक्याच्या ठिकाणी स्थानांतरित करण्याचे निर्देशही सभेत देण्यात आले.
आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत कामाचा आढावा सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती जमीरउल्लाखॉ पठाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समितीचे सदस्य गुलाम हुसेन देशमुख, विजय लव्हाळे, मंजूषा वडतकार, गोदावरी जाधव यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘त्या’ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करा!
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती जमीरउल्लाखॉ पठाण यांनी सोमवारी उरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता, येथील दोन आरोग्य अधिकारी व सहा कर्मचारी गैरहजर आढळून आले. गैरहजर आढळून आलेल्या संबंधित दोन वैद्यकीय अधिकारी व सहा कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश आरोग्य समितीच्या सभेत देण्यात आले.