डॉक्टरांअभावी ५० टक्के १०८ रुग्णवाहिकांना ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 04:31 PM2020-02-04T16:31:21+5:302020-02-04T16:31:29+5:30
१०८ रुग्णवाहिकेवर डॉक्टर नसल्याने राज्यभारतील जवळपास ५० टक्के रुग्णवाहिकांना ब्रेक लागला आहे.
- प्रवीण खेते
अकोला : कमी वेतनामुळे डॉक्टर १०८ रुग्णवाहिकेमध्ये सेवा देण्यास नकार देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांशिवाय रुग्णवाहिका कॉलवर नेणे शक्य नसल्याने राज्यभरातील जवळपास ५० टक्के १०८ रुग्णवाहिकांना ब्रेक लागल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या मदतीने २०१३ मध्ये राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू केली होती. यामध्ये अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट आणि बेसिक लाइफ सपोर्ट अशा दोन प्रकारच्या रुग्णवाहिकांचा समावेश आहे. अपघात झाल्यास किंवा दवाखान्यातून जाऊन तत्काळ उपचार घेण्याची गरज भासल्यास १०८ क्रमांकावर कॉल करताच किमान वेळेत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होते. रुग्णवाहिका वेळेत आल्याने अनेकांना योग्य वेळी उपचारही मिळतो; पण रुग्णांसाठी संजीवनी ठरणाऱ्या या रुग्णवाहिकेवर कार्यरत डॉक्टरांना मिळणारे वेतन अत्यल्प आहे. त्यामुळे राज्यभरातील बहुतांश रुग्णवाहिकेवरील डॉक्टरांनी सेवा देण्यास नकार दिला आहे. १०८ रुग्णवाहिकेवर डॉक्टर नसल्याने राज्यभारतील जवळपास ५० टक्के रुग्णवाहिकांना ब्रेक लागला आहे.
रुग्णवाहिकांचे मेन्टन्स नाहीच!
१०८ सेवा पुरविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो; परंतु या रुग्णवाहिकांची नियमित देखभाल केली जात नाही. त्यामुळे अनेक रुग्णवाहिका बंद आहेत. शिवाय, बहुतांश नादुरुस्त रुग्णवाहिका रस्त्यावर धावत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
अकोला जिल्ह्यातील स्थिती
- जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या १२
- ५० पैकी केवळ ३३ वैद्यकीय अधिकारी देताहेत सेवा
- वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील ५० टक्के रुग्णवाहिका बंद
- परिणामी अकोल्यातील रुग्णवाहिका देताहेत वाशिम, बुलडाणा अन् अमरावतीमध्ये सेवा
- पातूर, बाळापूर, पिंजर येथील रुग्णवाहिकांना इतर जिल्ह्यातील कॉल
१०८ अकोला वुमन्स रुग्णवाहिका बंद
अकोला जिल्ह्यातील १०८ वुमन्स रुग्णवाहिकेमध्ये बिघाड असल्याने गत १५ दिवसांपासून रुग्णवाहिकेची सेवा ठप्प आहे. विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेवर तीन डॉक्टर कार्यरत आहे; परंतु नियमित रुग्णवाहिकेची देखभाल होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
१०८ रुग्णवाहिकेच्या सेवेमध्ये अनेक समस्या उद््भवत आहेत. काही रुग्णवाहिकांची सेवा बंद असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. रुग्णवाहिकांच्या समस्येमुळे रुग्णसेवा प्रभावित होत आहे. या संदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांनी आढावा घेतला आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला