५० टक्के एकदम ओक्के, ५९ हजारांपेक्षा अधिक महिलांनी केला अर्ध्या तिकिटात प्रवास
By Atul.jaiswal | Published: March 21, 2023 01:17 PM2023-03-21T13:17:48+5:302023-03-21T13:18:44+5:30
एसटी बसमध्ये महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी १७ मार्चपासून सुरू झाली.
अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्वच प्रकारच्या बसगाड्यांमध्ये सर्वच वयोगटातील महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी १७ मार्चपासून सुरू झाली असून, महामंडळाच्या अकोला विभागातील नऊ आगारांच्या बसमधून पहिल्या तीन दिवसांमध्ये ५९,६६८ महिलांनी सवलतीच्या दरात प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत घोषित केली आहे. ‘महिला सन्मान योजना ‘या नावाने ही योजना लागू करण्यात आली असून, याअंतर्गत सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसमध्ये महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.
शुक्रवार, १७ मार्चपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून, पहिला दिवस अत्यंत कमी महिलांनी प्रवास केला. मात्र, या योजनेची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी बसस्थानकावर महिलांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. अकोला विभागातील नऊ आगारांतून एकूण ५९ हजार ६६८ महिलांनी सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये १७ मार्च रोजी पहिल्याच दिवशी १० हजार ४७७ महिलांनी ५० टक्के सवलतीत प्रवास केला. दुसऱ्या दिवशी १८ मार्च रोजी २५ हजार ०६६ महिलांनी, तर तिसऱ्या दिवशी १९ मार्च रोजी २४ हजार ०८५ महिला प्रवाशांनी सवलतीचा लाभ घेतला.
शिवशाहीमध्ये वाढली गर्दी
महिलांना प्रवास भाड्यात सवलत देणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर शिवशाही बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र पहिल्या तीन दिवसांमध्ये दिसून येत आहे. सवलत लागू झाल्यानंतर साध्या बसच्या पूर्ण भाड्यापेक्षा शिवशाही बसचे सवलतीचे भाडे कमी लागत असल्याने महिला शिवशाही बसमध्ये प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये महिलांना ५० टक्के सवलत सुरू झाली असून, या महिला सन्मान योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवसांत ५९ हजारांवर महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
शुभांगी शिरसाट,
विभाग नियंत्रक, अकोला विभाग