५0 टक्के क्षेत्रावरच पेरणी!
By admin | Published: July 1, 2015 01:41 AM2015-07-01T01:41:52+5:302015-07-01T01:41:52+5:30
पावसाअभावी व-हाडात पेरण्या खोळंबल्या.
अकोला : पश्चिम विदर्भातील (वर्हाड) पाच जिल्हय़ांत ५0 टक्केपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे; परंतु गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांनी आता पेरण्या थांबविल्या आहेत. यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकर्यांचा आनंद द्विगुणित झाला होता; तथापि सध्या पाऊसच नसल्याने शेतकर्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पश्चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांमध्ये खरिपाचे एकूण पेरणीलायक क्षेत्र ३२ लाख ८३ हजार ८00 हेक्टर असून, २९ जूनपर्यंत १६ लाख हेक्टरच्यावर पेरणी पोहोचल्याचा अंदाज आहे. शेतकर्यांनी यंदाही सोयाबीनला पसंती दिल्याने सोयाबीनचे क्षेत्र या विभागात सहा लाख हेक्टरवर पोहोचले आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्हय़ात सर्वाधिक ४ लाख हेक्टरच्यावर पेरणी आटोपली आहे. त्या खालोखाल २६ जूनपर्यंत बुलडाणा जिल्हय़ात ३ लाख ४१ हजार ६00 हेक्टर म्हणजेच ४६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. वाशिम जिल्हय़ात २,८000 हेक्टर ६८ टक्के , अमरावती १ लाख ३५ हजार १९ टक्के, तर अकोला जिल्हय़ात केवळ १ लाख ३६ हजार ५00 हेक्टर म्हणजेच २८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
*सोयाबीनचा पेरा वाढला
पाच जिल्हय़ांत सुरुवातीला कपाशीने आघाडी घेतली होती. आता सोयाबीनचे क्षेत्र वाढले असून, शुक्रवारपर्यंत ६ लाख हेक्टरवर शेतकर्यांनी सोयबीनचा पेरा केला. कापसाचे क्षेत्रही ४ लाख ८८ हजार १00 हेक्टरच्यावर पोहोचले आहे. मूग २८,९00, उडीद १ लाख ८७ हजार, तर तुरीची १ लाख २५ हजार ७00 हेक्टरच्यावर पेरणी झाली आहे.
*पाऊस असमान
पाच जिल्हय़ांत १ ते २६ जूनपर्यंत (सरासरी १३२.२ मि.मी.) प्रत्यक्ष १७८.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा जिल्हय़ातील घाटाखालील जिल्हय़ाला पावसाची प्रतीक्षा आहे. २६ जूनपर्यंत बुलडाणा जिल्हय़ात ११८.२ मि.मी., अकोला जिल्हा ११२.७ मि.मी., वाशिम जिल्हा १४२.१ मि.मी., अमरावती जिल्हय़ात १२६.५ मि.मी., तर यवतमाळ जिल्हय़ात १५२.२ एवढा पावसाची नोंद झाली आहे.