ओसाड रानावर एकाचवेळी लावली ५00 झाडे
By admin | Published: October 2, 2015 02:20 AM2015-10-02T02:20:13+5:302015-10-02T02:20:13+5:30
निंभा येथील विद्यार्थी व ग्रामस्थांचा अभिनव उपक्रम.
संतोष येलकर / अकोला : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्याची संकल्पना.. विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग.. आणि वृक्ष लागवडीच्या अभिनव उपक्रमातून मूर्तिजापूर तालुक्यातल्या निंभा शिवारातील दोन एकर ओसाड रानावर गुरुवारी एकाच दिवशी अन् एकाचवेळी ५00 झाडे लावण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात गावोगावी वृक्ष लागवड केली जाते. यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात ९0 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेला देण्यात आले आहे; मात्र सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यात झालेल्या वृक्ष लागवडीचे प्रमाण बघता, जिल्ह्यातील हे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता नसतानाच निंभा येथे एकाच दिवशी (गुरुवारी) आणि एकाच वेळी ५00 झाडे लावण्यात आली. निंभा शिवारात ९७ एकर ई-क्लास जमीन असून, त्यापैकी २ एकर ओसाड जमिनीवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्यासह निंभा येथील विठ्ठल रुख्माई विद्यालयाच्या २५0 विद्यार्थी आणि २५0 ग्रामस्थांनी पाच मिनिटात एकाचवेळी वृक्षरोपण करीत ५00 झाडे लावली. विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून ओसाड रानावर वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र गोपकर, देवानंद गणोरकर, सरपंच जयश्री देशमुख, उपसरंपच, ग्रामपंचायत सदस्यांसह सामाजिक कार्यकर्ते ए.एस.नाथन, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम.कुळकर्णी, सर्मथ शेवाळे, गटविकास अधिकारी जी.पी.अगते आणि विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.