५१ नगरसेवकांनी केल्या स्वाक्षरी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:03 AM2017-10-25T01:03:33+5:302017-10-25T01:04:09+5:30
अकोला : महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी भाजपाच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. मंगळवारी स्थानिक मंगल कार्यालयात पार पडलेल्या भाजपाच्या बैठकीत ५१ नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी स्वाक्षरी केल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मागील सात महिन्यांमध्ये नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांकडे दुर्लक्ष करीत महापालिका आयुक्त अजय लहाने त्यांच्या स्तरावर कामे निकाली काढत आहेत. प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. साफसफाईची ऐशीतैशी झाली असून, पथदिव्यांच्या समस्येने सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत. मनपा अधिकार्यांकडे समस्यांचे कथन केल्यानंतर त्या निकाली काढणे अपेक्षित आहे. तसे न होता प्रशासनाकडून नगरसेवकांचा वारंवार अपमान केला जात असल्याचा आरोप सत्ताधारी भाज पाचे नगरसेवक करीत आहेत. प्रभागात नागरिकांचा रोष आणि मनपात अधिकार्यांकडून होणारा अपमान लक्षात घेता भाजपाने महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येते.
त्या पृष्ठभूमीवर स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी २३ ऑक्टोबर रोजी महापौर विजय अग्रवाल यांना विशेष सभा घेण्यासंदर्भात पत्र व्यवहार केला. मंगळवारी सकाळी स्थानिक मंगल कार्यालयात भाजपाची बैठक पार पडली असता स्थानिक सर्व नेते, मनपातील पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी भाजपाला ५0 नगरसेवकांच्या संख्याबळाची आवश्यकता आहे. या बैठकीत ५१ नगरसेवकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती आहे.