थॅलेसेमियाग्रस्त चिमुकलीसाठी ५१ जणांचे रक्तदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:20 AM2021-09-11T04:20:02+5:302021-09-11T04:20:02+5:30
बबन इंगळे बार्शीटाकळी: चोहोगाव येथील दोन वर्षांच्या चिमुकलीला थॅलेसेमियाने ग्रासले असता तिला दर महिन्याला रक्त पुरवठा करण्यात येतो. ही ...
बबन इंगळे
बार्शीटाकळी: चोहोगाव येथील दोन वर्षांच्या चिमुकलीला थॅलेसेमियाने ग्रासले असता तिला दर महिन्याला रक्त पुरवठा करण्यात येतो. ही बाब सायखेड येथील युवक धीरज भाऊराव इंगळे यांना कळताच त्याने वाढदिवसाचा सर्व खर्च टाळून चिमुकलीसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिराबाबत माहिती मिळताच युवकांनी मदतीचा हात पुढे करीत अवघ्या दोन तासात ५१ जणांनी रक्तदान केले.
चोहोगाव येथील दोन वर्षांची चंचल श्रीकांत जगताप या चिमुकलीला थॅलेसेमियाने ग्रासले आहे. त्यामुळे तिला दर महिन्याला रक्त पुरवठा करण्यात येतो. याबाबत माहिती मिळताच युवकांनी पुढाकार घेत रक्तदान केले आहे. या उपक्रमाची माहिती कळताच राजेश धाबेकर, गजानन गालट, लक्ष्मण गालट, सचिन गालट, अमोल जामनिक, जितेंद्र इंगळे यांच्यासह प्रतिष्ठितांनी शिबिरस्थळी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. रक्तदान शिबिरातील रक्त संकलनाचे कार्य अकोला येथील साई जीवन ब्लड बँकेचे सिद्धार्थ कटारे, दिनेश हिवराळे, वैभव इंगोले, ऋषिकेश झांबरे यांनी केले. वयाच्या सहा महिन्यापासून चंचल जगताप या चिमुकलीला थॅलेसेमियाने ग्रासल्यामुळे तिला दर महिन्याला रक्त पुरवठा करावा लागतो. भविष्यात या चिमुकलीसाठी रक्तसाठा आरक्षित ठेवण्यासाठी धीरजने वाढदिवसाच्या कार्यक्रमाला फाटा देत रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधीलकी जपली, आणि त्याला अनेक जणांचे सहकार्यही लाभले.
--------------------
धाबा येथे रक्तदान शिबिर
धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. ५ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन खिल्लारे यांच्या पुढाकाराने या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनाचे कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील पथकाने केले आहे.