शेतक-यांसाठी ५१३ मेट्रिक टन धान्यसाठा मंजूर
By admin | Published: August 10, 2015 01:39 AM2015-08-10T01:39:57+5:302015-08-10T01:39:57+5:30
अकोला जिल्ह्यातील लाभार्थी शेतक-यांना मिळणार २ रुपये किलो गहू, ३ रुपये किलो तांदूळ.
संतोष येलकर/ अकोला: पावसाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरात धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील एपीएल केशरी कार्डधारक लाभार्थी शेतकर्यांना २ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ वितरित करण्यासाठी ५१३ मेट्रिक टन धान्यसाठा शासनाकडून शुक्रवारी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या जून महिन्याच्या प्रारंभी झालेल्या पावसानंतर राज्यातील अनेक भागात पावसाने दांडी मारली. खरीप पेरण्यांनंतर पाऊस आला नसल्याने, शेतकरी हवालदिल झाला. नापिकीच्या परिस्थितीत शेतकर्यांनी आत्महत्या करण्याच्या घटना होऊ नयेत, यासाठी औरंगाबाद व अमरावती विभागातील जिल्ह्यांमधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या एपीएल (केशरी कार्डधारक) शेतकरी कुटुंबातील सदस्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्याचा निर्णय २४ जुलै रोजी शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार लाभार्थी शेतकर्यांना २ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदळाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी कुटुंबातील सदस्यांना सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यासाठी ऑगस्ट महिन्याकरिता शासनामार्फत ५१३ मेट्रिक टन धान्यसाठा मंजूर करण्यात आला आहे. लाभार्थी शेतकरी कुटुंबातील सदस्यांच्या याद्या तयार करण्याचे काम जिल्ह्यातील सातही तालुक्यात रास्तभाव दुकानांमार्फत सुरू करण्यात आले असून, याद्या तयार झाल्यानंतर, जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकर्यांना सवलतीच्या दरात गहू व तांदळाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.