जिल्ह्यात ५३० ग्रा.पं. कोरोनामुक्त; कोरोना संसर्ग नियंत्रणात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:25 AM2021-08-18T04:25:13+5:302021-08-18T04:25:13+5:30
अकोला : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने घटली असून, दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आता केवळ ३० ॲक्टिव्ह रुग्णांवर ...
अकोला : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने घटली असून, दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आता केवळ ३० ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील तब्बल ५३० ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या असून, तूर्तास तरी एकही हॉटस्पॉट नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने कोविड-१९चे लसीकरण सुरू केले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात आला. मे महिन्याच्या अखेरपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊन जुलै महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. तसेच नागरिकांनीदेखील नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य केले. सध्या जिल्ह्यात आठवड्यातून सरासरी दोन-तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. जिल्ह्यात जवळपास ५३४ ग्रामपंचायती असून, त्यातील ५३० ग्रा.पं.ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. शहरासह केवळ ५ गावांमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यात सध्या एकही हॉटस्पॉट ठिकाण नसून, कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात असल्याचे दिसून येते. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक ठरत आहे.
-------------------
जिल्ह्यातील कोरोनाबाधित ग्रा.पं.
तालुका ग्रा.पं.
अकोला- ३
बाळापूर- १
पातूर- ०
बार्शीटाकळी- ०
तेल्हारा- ०
अकोट- ०
----------
जिल्ह्यातील कोरोनामुक्त ग्रा.पं.
तालुका ग्रा.पं.
अकोला- ३५
बाळापूर- ६५
पातूर- ८४
बार्शीटाकळी- ८३
तेल्हारा- ९९
अकोट- ७८
----------------------------
दररोज सरासरी ९००-१००० कोरोना चाचण्या
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी खबरदारीचा प्रयत्न म्हणून दैनंदिन सरासरी ९०० कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांपैकी दैनंदिन सरासरी दोन ते तीन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. गत १० दिवसांत १५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.