सराफा व्यावसायिकांना ५४ कोटींचा फटका
By admin | Published: March 10, 2016 02:21 AM2016-03-10T02:21:59+5:302016-03-10T02:21:59+5:30
अबकारी कराविरुद्ध पुकारलेल्या बंदचा परिणाम.
राम देशपांडे / अकोला
अबकारी कर (एक्साईज ड्युटी) आकारण्याविरुद्ध सराफा व्यावसायिकांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये अकोला जिल्ह्यातील ८00 पेक्षा अधिक सराफा व्यावसायिक सहभागी झाले आहेत. केंद्रीय मंत्र्यांसोबत यशस्वी न ठरलेल्या चर्चेमुळे प्रारंभी तीन दिवस पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला आता अनिश्चितकालीन बंदचे स्वरूप प्राप्त झाले. २ मार्चपासून सुरू असलेल्या बंदमुळे जिल्ह्यातील सराफा व्यावसायिकांना दररोज सहा कोटी याप्रमाणे ५४ कोटींचा फटका सहन करावा लागला आहे.
सोन्याचे दागिने घडविणार्या तसेच त्यांची खरेदी-विक्री करणार्या सराफा व्यावसायिकांकडून एक टक्का अबकारी कर (उत्पादन शुल्क) आकारण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर केला. सुवर्ण अलंकारांची मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री करणार्या सराफा व्यावसायिकांना ही अट जाचक ठरणार नसली तरी या क्षेत्रातील असंघटित असलेल्या ८0 टक्के सराफा व्यावसायिकांना अबकारी कर भरणे अशक्य होणार आहे. या बंदला पाठिंबा देत अकोला सराफा असोसिएशनने जिल्ह्यातील सर्व सराफा व्यावसायिकांना बंदचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ८00 पेक्षा अधिक सराफा व्यावसायिकांनी २ मार्चपासून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. या बंदमुळे जिल्ह्यातील १५00 सुवर्ण कारागिरांचा व्यावसायदेखील प्रभावित झाला आहे. परिणामी दररोज सहा कोटींचा व्यवसाय करणार्या अकोला जिल्ह्यातील सराफा व्यावसायिकांना बुधवार, ९ मार्चपर्यंत ५४ कोटींच्या वर आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती अकोला सराफा असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी ह्यलोकमतह्णला दिली.