५५ कोटींच्या विकास कामांना २० मिनीटात मंजुरी; वर्क आॅर्डरचा मार्ग मोकळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:49 PM2019-03-02T12:49:48+5:302019-03-02T12:50:06+5:30
अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिकेतील स्थायी समितीच्या सभेने अवघ्या वीस मिनीटात ५५ कोटी ४८ लाख रुपयांतून होणाऱ्या विकास कामांच्या निविदा मंजूर केल्या.
अकोला: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिकेतील स्थायी समितीच्या सभेने अवघ्या वीस मिनीटात ५५ कोटी ४८ लाख रुपयांतून होणाऱ्या विकास कामांच्या निविदा मंजूर केल्या. हद्दवाढ क्षेत्रात समावेश असणाऱ्या पाच प्रभागातील ४५९ विकास कामांना मंजुरी देण्यात आल्यामुळे कार्यादेश (वर्क आॅर्डर)जारी करण्याचा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मनपा क्षेत्राची हद्दवाढ करून शहरालगतच्या २४ गावांचा मनपात समावेश करण्यात आला. हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांसाठी मनपाने शासनाकडे सादर केलेल्या १०० कोटींच्या प्रस्तावांपैकी ९६ कोटींचा निधी मंजूर केला. पहिल्या टप्प्यात २० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यादरम्यान, मनपाने हद्दवाढ क्षेत्रातील नवीन प्रभागातील विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार केले. या प्रस्तावांना राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर आठ निविदा प्रकाशित करण्यात आल्या. यादरम्यान, एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास विकास कामे रखडण्याची शक्यता लक्षात घेता सत्तापक्ष भाजपाच्यावतीने सभापती विशाल इंगळे यांनी शुक्रवारी तातडीने स्थायी समिती सभेचे आयोजन केले होते. यावेळी सभेला सुरुवात होताच प्रभाग क्रमांक ८ मधील भाजपाचे सदस्य सुनील क्षीरसागर यांनी हद्दवाढ क्षेत्रात रखडलेल्या विकास कामांच्या संदर्भात सविस्तर भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर सभापती विशाल इंगळे यांनी अवघ्या वीस मिनीटात ५५ कोटी ४८ लाख रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली, तसेच प्रशासनाला तातडीने कार्यारंभ आदेश (वर्क आॅर्डर)देण्याचे निर्देश दिले. सभेला विनोद मापारी, अनिल गरड, मंगेश काळे, पल्लवी मोरे, अर्चना मसने, नंदा पाटील, उषा विरक यांच्यासह मनपा उपायुक्त डॉ. दीपाली भोसले, नगर सचिव अनिल बिडवे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.
- 24 गावे हद्दवाढीत- समाविष्ट
- 100 कोटींचा विकास आराखडा
- 96- कोटीचा निधी मंजूर
- 20-कोटीचा निधी प्राप्त
४५९ प्रस्तावांना मंजुरी
हद्दवाढ क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. स्थायी समितीच्या सभेत नवीन पाच प्रभागांसाठी तब्बल ४५९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, नाल्या, जलवाहिनी, विद्युत खांब, पथदिवे, उद्यानांचे सौंदर्यीकरण, सामाजिक सभागृह आदी सर्वांगीण विकास कामांचा समावेश आहे.
सहापैकी चार निविदा उघडल्या!
बांधकाम विभागाने तयार केलेल्या ४५९ प्रस्तावांसाठी सहा निविदा प्रकाशित केल्या. यापैकी चार कामांसाठी निविदा अर्ज प्राप्त झाले. प्रशासनाने २८ फेब्रुवारी रोजी निविदा उघडून स्थायी समितीसमोर सादर केल्या असता त्यांना मंजुरी देण्यात आली.
‘बॅकडेट’मध्ये नकाशा मंजुरी!
तत्कालीन ग्रामपंचायती भ्रष्टाचाराचे कुरण झाल्या होत्या, असे मत नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी मांडले. आजही वर्तमान स्थितीत काही ग्रामसेवक नागरिकांना ‘बॅकडेट’मध्ये घर बांधकामाचा नकाशा मंजूर करून देत असल्याचा गंभीर आरोप सुनील क्षीरसागर यांनी केला. खा. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांचा अनुशेष दूर होणार असल्याने प्रशासनाने तातडीने वर्क आॅर्डर जारी करावी, असे मत त्यांनी नमूद केले.
अशी केली तरतूद!
प्रभाग क्रमांक एकूण कामे मंजूर रक्कम
४ ५५ १३ कोटी ९० लाख ८६ हजार रुपये
८ ११९ १३ कोटी ७१ लाख ७३ हजार
१३, १८ १५४ १२ कोटी ६५ लाख २७ हजार
१४ १३१ १५ कोटी २० लाख ६० हजार