रिव्हॉल्वरसह ५५ हजार जप्त
By Admin | Published: July 7, 2014 11:57 PM2014-07-07T23:57:31+5:302014-07-07T23:57:31+5:30
सोनेरी टोळीला न्यायालयीन कोठडी
वाशिम : स्वस्त भावात सोने देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुटणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने ७ जुलै रोजी पर्दाफाश केला. या गुन्ह्यामधील तीनही आरोपींना मालेगाव येथील न्यायालयात आज ७ जुलै रोजी हजर केले असता न्यायाधिशांनी तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक रिव्हॉल्वर, दोन जिवंत काडतुसे व एक सोन्याची अंगठी जप्त केली.
प्राप्त माहितीनुसार जानेवारी २0१४ मध्ये नांदेड येथील एका शेतकर्याला लक्ष्मण उर्फ मिथुन मधुकर चव्हाण, नरेश भवरलाल पवार व राजेश भवरलाल पवार या तिघांनी संगनमत करून कमी भावामध्ये सोने देण्याचे आमिष दाखवून त्याला मालेगाव तालुक्यातील पांगरखेड येथे सोने खरेदीसाठी बोलावले होते. नांदेड येथील शेतकरी दीपक वसंतराव भोरे व त्याच्यासोबत वर्षा श्रीकांत जोंधळे हे दोघे सोने खरेदी करण्यासाठी आले. उपरोक्त तीन आरोपींनी भोरे व जोंधळे या दोघांवर हल्ला चढवून त्यांच्याजवळ असलेली रोख रक्कम, महिलेच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने व रिवाल्हर असा एकुण दोन लाख ४ हजाराचा ऐवज लंपास केला.
त्यावेळेसपासुन तीनही आरोपी पसार होते. या आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे होते. पोलिस अधिक्षक तुषार पाटील व पोलिस निरिक्षक संग्राम सांगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर, पोलिस उपनिरिक्षक कैलास इंगळे, उत्तम गायकवाड, विनोद अवगळे, संदीप इढोळे, विपुल शेळके, धनंजय अरखराव, नंदकिशोर भडके आदींचा समावेश असलेल्या पथकाला उपरोक्त आरोपी पांगरखेडा येथे आले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यामुळे अटक करण्यात यश आले.
या आरोपींकडून पोलिसांनी एक रिव्हॉल्वर, दोन जिवंत काडतुसे व एक सोन्याची अंगठी असा एकुण ५५ हजार ५00 रूपयाचा ऐवज जप्त केला. या तिन्ही आरोपींकडून ईतर गुन्ह्यातील माहिती प्राप्त होण्यासाठी पोलिसांनी पोलिस कोठडी मिळण्यासाठी मालेगाव न्यायाधिशांना अर्ज सादर केला होता.पोलिसांची मागणी खारीज करीत न्यायालयाने या आरोपिंना आज ७ जुलै रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली. (नगर प्रतिनिधी)