अकोला जिल्ह्यातील कपाशीचे ५६ टक्के पंचनामे पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:32 AM2017-12-19T01:32:15+5:302017-12-19T01:55:00+5:30
अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम ५६ टक्के पूर्ण झाले असून, पंचनामे तातडीने करून पीक नुकसानाचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हय़ातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या आढावा बैठकीत दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम ५६ टक्के पूर्ण झाले असून, पंचनामे तातडीने करून पीक नुकसानाचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हय़ातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या आढावा बैठकीत दिले.
राज्यातील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे., तसेच तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने कपाशी व धान पिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकर्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागामार्फत देण्यात आला आहे. त्यानुषंगाने बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्हय़ातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून, अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांनी गत ८ डिसेंबर रोजी जिल्हय़ातील तहसीलदारांना दिला होता. त्यानुसार जिल्हय़ातील सातही तालुक्यात तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले; परंतु पंचनामे करण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याच्या मुद्दयावर तीव्र नाराजी व्यक्त करीत, पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १३ डिसेंबर रोजी जिल्हय़ातील तहसीलदारांना दिला होता. त्यानंतर सोमवार, १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची बैठक घेऊन, कपाशी पीक नुकसानाच्या पंचनामे कामाचा आढावा घेतला.
त्यामध्ये १८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम ५६ टक्के पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील उर्वरित कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून, नुकसानाचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी या बैठकीत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले.
जिल्ह्यात कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याच्या कामाला गती आली आहे. १८ डिसेंबरपर्यंत ५६ टक्के कपाशी नुकसानाचे पंचनामे करण्यात आले असून, उर्वरित पंचनामे तातडीने करून दोन दिवसात कपाशी पीक नुकसानाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदार व उपविभागीय अधिकार्यांना दिले.
-आस्तिककुमार पाण्डेय
जिल्हाधिकारी.