स्वातंत्र्यदिनी ५७ ग्रामपंचायती घेणार दुष्काळमुक्तीचा ठराव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:35 AM2017-08-15T01:35:54+5:302017-08-15T01:36:01+5:30
शिर्ला : पाण्याचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी पातूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायती दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारण विकास आराखडा मंजूर करणारा ठराव स्वातंत्र्य दिनाच्या विशेष ग्रामसभेत मांडणार असल्याची माहिती पातूर पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी ‘लोकमत’ला दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला : पाण्याचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी पातूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायती दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारण विकास आराखडा मंजूर करणारा ठराव स्वातंत्र्य दिनाच्या विशेष ग्रामसभेत मांडणार असल्याची माहिती पातूर पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी ‘लोकमत’ला दिली.
पातूर तालुक्यात १00 हून गावे तथा ५७ ग्रामपंचायती आहेत. आज शिर्ला, पांगरताटी, चारमोळी ही जलसंधारणाची कामे केलेली गावे वगळता इतर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये पाणीटंचाईची भीषणता आणि दुष्काळाची तीव्रता अधिक गडद होत चालली आहे. त्यावर गतवर्षी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पाणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा सिनेअभिनेते अमिर खान यांच्या संकल्पनेतून पातूर तालुक्यातील ६५ हून गावांनी थोड्या अधिक प्रमाणात जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र दुष्काळाची तीव्रता कमी करण्यात तालुक्यातील शिर्ला, पांगरताटी, चारमोळी यशस्वी ठरले आहेत.
यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत निम्माही पाऊस तालुक्यात पडला नाही.
त्यामुळे दुष्काळाची तीव्रता अधिक वाढत जाणार आहे. त्यावर पाणी फाउंडेशनने उभी केलेली जलचळवळ, वाढता लोकांचा सहभाग, त्यातून होणारी जलसंधारणाचे काम कायमस्वरूपी दुष्काळाला हरवू शकतात. या वर्षी १५ऑगस्टच्या विशेष ग्रामसभेतून प्रत्येक गावातून पाच कार्यकर्ते त्यात दोन महिलांचा अंतर्भाव करून निवड करावी, त्याबरोबरच गावात करावयाच्या जलसंधारण कामांचा आराखडा मांडून ठराव घ्यावा, अशी विनंती पाणी फाउंडेशनचे पातूर तालुका समन्वयक सुभाष नानोटे, प्रफुल्ल कोल्हे यांनी गटविकास अधिकारी शेखर शेलार यांना केली होती. त्यावर त्यांनी लगेचच सूचना दिल्या आहेत. स्वातंत्र्य चळवळनंतर प्रथमच जलचळवळ दुष्काळ मुक्तीसाठी उभी राहत आहे. दुष्काळाच्या चोरट्या पावलांचा अंदाज घेऊन पूर्वनियोजन करणारी कदाचित जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरेल, असे वाटते.