हरभरा बियाणे अनुदानाचे ५७ लाख लाटले
By admin | Published: November 14, 2016 03:08 AM2016-11-14T03:08:10+5:302016-11-14T03:08:10+5:30
लाभ शेतक-यांऐवजी कृषी केंद्रांच्या घशात.
सदानंद सिरसाट
अकोला, दि. १३- शेतकर्यांना शासनाने अनुदानावर दिलेल्या १९१४ क्विंटल हरभरा बियाणे वाटपात अकोला शहरातील महाबीजच्या दोन वितरकांनी अनुदानाची जवळपास ६0 लाखांपर्यंतची रक्कम शेतकर्यांऐवजी स्वत:च्या घशात घातली आहे. या प्रकाराचा उलगडा करण्यात महाबीज आणि जिल्हा परिषदेचा कृषी विभाग असर्मथ ठरत आहे. शासनानेच बियाणे वाटप घोटाळ्याची स्वतंत्र चौकशी करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, हे बियाणे दुसर्या केंद्रांना वाटप केल्याचे सांगत त्याची कुठलीही माहिती या दोन वितरकांनी शासकीय यंत्रणेला दिलेली नाही.
शासनाने शेतकर्यांना रब्बी हंगामासाठी हरभरा बियाणे अनुदानित दराने दिले. त्यासाठी प्रतिकिलो बियाण्यामागे ३0 रुपये महाबीजला दिले. त्यानुसार महाबीजने ८0 रुपये किलोप्रमाणे ३0 किलोची बॅग त्यांच्या वितरकांना दिली. अकोला शहरातील दोन वितरकांना त्यांना स्वत: वाटप करण्यासाठी ३६८४ बॅग दिल्या. त्यामध्ये एकाला १३९६ तर दुसर्याला २२८८ बॅग मिळाल्या. त्याचवेळी एकाने ४0१९ आणि दुसर्याने २0२९ बॅगचे वाटप कृषी सेवा केंद्रांना केल्याची माहिती आहे. महाबीजच्या त्या दोन वितरकांनी स्वत:कडचे बियाणे म्हणून ३६८४ बॅग वाटप केलेल्या शेतकर्यांची यादी महाबीजला दिली. त्यामध्ये दोघांनीही जवळपास ५0 ते ५२ केंद्रांना बियाणे दिल्याचे म्हटले आहे, तर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे दिलेल्या माहितीत २0 ते २५ केंद्रांचाच उल्लेख आहे. त्या दोन वितरकांनी शासनाच्या दोन विभागासोबत सुरू केलेला खेळ पाहता, अनुदानित बियाणे वाटपात मोठाच घोळ झाल्याचे दिसत आहे; मात्र तो शोधून काढण्यात कृषी विभाग सर्मथ नसल्याचे गेल्या काही दिवसांच्या चौकशीवरून स्पष्ट होत आहे.
शासनाच्या ५७ लाखांच्या अनुदानाला चुना
हरभरा बियाणे सवलतीच्या दरात शेतकर्यांना देण्यासाठी शासनाने अनुदानाची रक्कम महाबीजकडे दिली. महाबीजने शासकीय अनुदानित बियाणे वाटप प्रक्रिया त्याच पद्धतीने राबविणे आवश्यक होते; मात्र शासनाने दिलेल्या अनुदानाचा लाभ शेतकर्यांना होण्याऐवजी महाबीजच्या वितरकांनाच होईल, अशाच पद्धतीने वाटप करण्यात आले आहे. त्यातून शेतकर्यांना हक्कापासून डावलून शासनाच्या लाखोंच्या अनुदानाला चुना लावण्यात आला आहे.
वितरकांकडून दिशाभूल करणारी माहिती
महाबीजचे वितरक असलेल्या या दोन केंद्रांकडून महाबीज, कृषी विभाग आणि माध्यमांची दिशाभूल केली जात आहे. मानेक टॉकीज परिसरात असलेल्या केंद्र संचालकाने आधी सहा ते सात केंद्रांना बियाणे दिल्याचे सांगितले होते. आता ५२ केंद्रांची नावे महाबीजला दिली आहेत.