अकोला जिल्ह्यात ५८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:22 AM2021-01-16T04:22:09+5:302021-01-16T04:22:09+5:30
अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक हजार ७४१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील ...
अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक हजार ७४१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ग्रामपंचायतींमध्ये सरासरी ६० टक्के मतदान झाले असून, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचा प्रकार घडला; मात्र प्रशासनाने तत्परतने दुसऱ्या मतदानयंत्राची सज्जता ठेवली असल्याने कुठेही मतदानाला उशीर झाला नाही.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकीत काेराेना नियमांची काटेकाेर अंमलबजावणी हाेईल ही अपेक्षा फाेल ठरली मतदानासाठी लागलेल्या रांगामध्ये मास्क घातलेल्या मतदारांची संख्या बाेटावर माेजता येईल एवढीच हाेती. दुसरीकडे ग्रामीण भागात मतदानासाठी उत्साह दिसून आला. सकाळी मतदानाला प्रतिसाद कमी हाेता. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत केवळ सात टक्के मतदान झाले हाेते; मात्र दुपारी मतदानाने वेग घेतला. दुपारी दीड वाजेपर्यंत ४० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हीच टक्केवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५८ टक्के झाली हाेती. रात्री उशिरापर्यंत प्रशासनाची आकडेमाेड सुरू हाेती. मतदानाची सरासरी ६० टक्क्यांवर पाेहोचेल असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला.
दरम्यान निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या ३२० जागांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचा अर्ज राहिल्याने संबंधित ३२० उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तसेच नऊ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने ग्रामपंचायत सदस्यांची नऊ पदे रिक्त राहणार आहेत. यंदा निवडणूक रिंगणातील उमेदवारांमध्ये दोन हजार ३९५ महिला उमेदवार असून, दोन हजार १६ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कारभारात महिलांचा टक्का वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात ८५१ मतदान केंद्रांपैकी २२० मतदान केंद्रे संवेदनशील हाेती. त्यामध्ये बार्शी टाकळी तालुक्यात सर्वाधिक ६० संवेदनशील मतदान केंद्रे असून, बाळापूर ३६, पातूर ३४, अकोट २६, तेल्हारा २४, अकोला २१, मूर्तिजापूर १९ अशा केंद्रांचा समावेश हाेता. येथे तगडा पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
सोमवारी निकाल
ग्रामपंचायत निवडणूक मतदानानंतर मतमोजणीची तयारी प्रशासनाने केली आहे. सोमवारी (दि. १८) मतमोजणी होणार आहे.