५८ गावे ब्लिचिंग पावडरविना
By admin | Published: July 5, 2014 12:46 AM2014-07-05T00:46:13+5:302014-07-05T01:00:26+5:30
५८ गावात आज स्थितीत ब्लिचिंग पावडर उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
वाशिम : पेयजलस्त्रोत असणार्या विहिरी, विंधनविहिरी, हापशा आदी स्त्रोतांमधील पाणी शुद्ध करण्यासाठी ग्रामपंचायतीनी ब्लिचिंग पावडर टाकणे आवश्यक असून,ती जबाबदारी चार पाडण्यासाठी ब्लिचिंग पावडरची खरेदी करुन त्याचा साठा बाळगणे हे प्रत्येक ग्रामपंचायतींचे कर्तव्य आहे. परंतु असे असतानाही जिल्हयात ५८ गावात आज स्थितीत ब्लिचिंग पावडर उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
ग्रामीण भागातील फार कमी गावात पाणीपुरवठा योजना आहेत. त्यापैकी बहुतांश ग्रामीण पाणीपुरवठा योजना बंद त्यातील काही वीज बिले थकीत झाल्यामुळे काही त्यांचे उपलब्ध पेयजलस्त्रोत अपुरे पडत असल्यामुळे काही पाईप लाईन फुटल्यामुळे तर काही पाणीपुरवठा योजना कालबाहय़ झाल्यामुळे बंद आहेत. परिणामी, जिल्हय़ातील बहुतांश गावांमधील लोकांना विहिरी, विंधनविहिरी, हापशा व नदी, ओढय़ांच्या पात्रात केलेल्या विहिर्यांमधून पिण्यासाठी पाणी भरुन न्यावे लागते. या पेयजल स्त्रोतामधील पाणी उन्हाळय़ात कमी कमी होत जाते. अशावेळी ते पाणी गढूळ व दुषित स्वरुपाचे येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे पावसाळय़ाच्या काळात पडणार्या पावसामुळे नदी, ओढय़ांना पुर येतात. विहिरी, विंधन विहिरी, हापशांना नवे पाणी येते. सदर पाणी गढूळ व दुषित असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे उन्हाळय़ात व पावसाळय़ात या सर्व पेयजलस्त्रोतामध्ये विशेष करुन ब्लिचिंग पावडर टाकणे दुषित पाणी पिण्यामुळे होणारे अतिसार, विषमज्वर, कॉलरा व अन्य जलजन्य आजार टाळण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असते. यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून ग्रामपंचायतींना वारंवार सूचना दिल्या जातात. ब्लिचिंग पावडर खरेदी करुन त्याचा नियमित वापर करण्याबाबत कळवले जाते.
ग्रामपंचायत अंतर्गत अनेक गावे असल्यास प्रत्येक गावात सुरक्षित ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा साठा करुन ठेवण्यास सांगितले जाते. या साठय़ाची आरोग्य विभागाचे कर्मचारी संबंधित गावाला भेटी देउन पाहणी करतात. परंतु, तरीही अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी ब्लिचिंग पावडरची खरेदी करुन तिचा साठा करुन ठेवण्याकडे दुर्लक्ष करतात. तसेच हा साठा करणार्या काही ग्रामपंचायतचे कर्मचारी तो सुरक्षित ठिकाणी ठेवत नाहीत. परिणामी तो पावसात भिजल्यास निकामी होतो.वाशिम जिल्हय़ातील ४९३ ग्रामपंचायती अंतर्गत येणार्या ६९६ गावांपैकी बहुतांश गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा साठा यंदा उपलब्ध आहे. मात्र ३९ ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणार्या ५८ गावांमध्ये ब्लिचिंग पावडर उपलब्ध नसल्याची बाब जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाअंतर्गत आरोग्य कर्मचार्यांनी केलेल्या सर्वेक्षणात आढळून आली आहे.