अकोला जीएमसीत आठवडाभरात वाढले कोविडचे ६ वॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 10:45 AM2021-02-18T10:45:05+5:302021-02-18T10:45:14+5:30
Akola GMC आठवडाभरातच येथील कोविड वाॅर्डची संख्या सहाने वाढून नऊवर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून बहुतांश गंभीर रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे आठवडाभरातच येथील कोविड वाॅर्डची संख्या सहाने वाढून नऊवर पोहोचली आहे. सद्य:स्थितीत सर्वोपचार रुग्णालयात १५६ कोविडबाधित रुग्ण दाखल असून त्यापैकी ५२ पेक्षा जास्त रुग्ण एमबीबीएसचे विद्यार्थी आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत येथील मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने जीएमसीवरील ताण वाढला आहे. दिवाळीनंतर कोविडच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याने सर्वोपचार रुग्णालयातील कोविड वॉर्डची संख्या केवळ तीनवर आली होती. शिवाय, उपलब्ध कंत्राटी मनुष्यबळदेखील कमी करण्यात आले होते. मात्र नियंत्रणात आलेली कोविड रुग्णांची संख्या फेब्रुवारीमध्ये पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. रुग्णसंख्या वाढत असली, तरी रुग्णालयांमध्ये केवळ २८६ रुग्णांवरच उपचार सुरू आहेत. यातील १५६ रुग्ण हे एकट्या जीएमसीमध्ये दाखल आहेत. रुग्णांच्या तुलनेत सर्वोपचार रुग्णालयात उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने ताण वाढला आहे.
मनुष्यबळाची स्थिती
पद - मनुष्यबळ दिले होते - सद्य:स्थितीत उपलब्ध - मागणी केली होती
नर्स - ५७ - २२ - १५०
वर्ग - ४ - २२ - ०७ - ५७
लॅब टेक्निशियन - ५ - २ - २०
फार्मासिस्ट - ०० - ०० - ७
एक्सरे टेक्निशियन - ०० - ०० - ३
कोविड केअर सेंटर सुरू करण्याची गरज
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात सद्य:स्थितीत ११९४ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यापैकी केवळ २८६ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित सर्वच रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. या रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात बेफिकिरी बाळगली जात असल्याने कोविडचा फैलाव झपाट्याने होत आहे. या दृष्टिकोनातून जिल्ह्यात बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
रुग्णालय - रुग्णसंख्या
जीएमसी - १५६
आयकॉन - २४
आोझोन - २४
रेजेन्सी - ०८
बिहाडे - २२
मूर्तिजापूर - २८
स्कायलार्क - १९
-----------------
एकूण - २८६
रुग्णसंख्या वाढ होत असल्याने सर्वोपचार रुग्णालयावरील ताण वाढत आहे. कोरोना काळात जिल्हा प्रशासनातर्फे कंत्राटी तत्त्वावर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले होते, मात्र कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यावर मनुष्यबळ कमी करण्यात आले. आता रुग्ण वाढत असल्याने रुग्णालयावरील ताण वाढला आहे. वाढीव मनुष्यबळासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे मागणी केली आहे.
- डॉ. निमाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला