एसटीला पाच महिन्यात ६० कोटींचा फटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:41 AM2021-09-02T04:41:02+5:302021-09-02T04:41:02+5:30
अकोला : एप्रिल व मे या महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने एसटीची प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. जून ...
अकोला : एप्रिल व मे या महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने एसटीची प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. जून पासून ही सेवा हळूहळू पूर्ववत होत आहे; परंतु सुरुवातीच्या काळात बहुतांश फेऱ्यांमधून डिझेल खर्चही निघणे कठिण झाले होते. त्यामुळे एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत अकोला विभागाला ६० कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागल्याची माहिती एसटी महामंडळाकडून मिळाली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एसटी महामंडळासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. जवळपास दीड वर्षांपासून एसटीची प्रवासी सेवा कधी बंद तर, कधी सुरू राहत आहे. याचा एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जास्त प्रमाणात उद्रेक झाल्याने पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामध्ये मार्च ते मे महिन्यापर्यंत ही सेवा बंद होती. काही दिवस अत्यावश्यक प्रवाशांसाठी फेऱ्या सोडण्यात आल्या ; मात्र त्याही तोट्यात राहिल्या. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात अकोला विभागाला १८ कोटी ९१ लाख ९८ हजार रुपये उत्पन्न मिळाले. तर, २०१९ मध्ये या पाच महिन्यात ७९ कोटी ४ लाख ३६ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते.
किलोमीटरही घटले !
२०१९ ला एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत अकोला विभागाच्या बसेसने २ कोटी ५७ लाख १५ हजार किमी अंतर गाठले होते. तर, यावर्षी ७२ लाख ८५ हजार किमी अंतर पार केले. यामध्ये १ कोटी ८४ लाख ३० हजार किमी अंतर घटले आहे.
एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान उत्पन्न
२०१९
७९,०४,३६,०००
२०२१
१८,९१,९८,०००
अद्यापही ३० टक्के बसेस आगारातच!
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात रात्री १० पर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढत असून बसेसच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहे ; परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे अनेकवेळा प्रवासी मिळत नसल्याने जवळपास ३० टक्के बसेस आगारातच उभ्या आहे.
नाशिक, पुणे गाडीला प्रतिसाद!
दोन महिन्यांपासून ठणठण जाणाऱ्या नाशिक, पुणे, मुंबई गाडीला आता प्रतिसाद मिळू लागला आहे. तसेच अमरावती व औरंगाबाद मार्गावर प्रवासी संख्या वाढली आहे. यामुळे आगार क्रमांक २ च्या उत्पन्नात थोड्या प्रमाणात भर पडत आहे.