एका दिवसात जिल्ह्याची ६0 कोटींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 01:16 AM2018-01-04T01:16:06+5:302018-01-04T01:16:34+5:30
अकोला : कोरेगाव भीमाच्या घटनेचे पडसाद बुधवारी राज्यभरात उमटले. अकोल्यातही सकाळी ११ वाजतापासून आंदोलक रस्त्यावर उतरल्याने जिल्हय़ात कडकडीत बंद पाळला गेला. त्यामुळे एकूण शहराची एका दिवसाची ६0 कोटींची उलाढाल ठप्प पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरेगाव भीमाच्या घटनेचे पडसाद बुधवारी राज्यभरात उमटले. अकोल्यातही सकाळी ११ वाजतापासून आंदोलक रस्त्यावर उतरल्याने जिल्हय़ात कडकडीत बंद पाळला गेला. त्यामुळे एकूण शहराची एका दिवसाची ६0 कोटींची उलाढाल ठप्प पडली.
जिल्हाधिकार्यांनी आणि शिक्षणाधिकार्यांनी मंगळवारी मध्यरात्रीच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे ऑटोरिक्षा, शाळांसाठी धावणारी वाहने रस्त्यावर आली नाहीत. पेट्रोल पंप-डीझल पंप बुधवारी संपामुळे उघडले नाहीत. अकोल्यातील नवीन, जुना कापड बाजार उघडला नाही. किराणा बाजारात बाहेरून येणारी वाहतूक बंद राहिली. त्यामुळे जिल्ह्याभरात मालाचा पुरवठा होऊ शकला नाही. हॉस्पिटल, दवाखाने बंद होती. अमरावती विभागात सर्वात जास्त उत्पन्न देणारी अकोल्यातील एमआयडीसीतील उद्योग बंद होते, ठोक भाजी बाजार, चिल्लर भाजी बाजार, फेरीवाले बाहेर पडले नाहीत, लहान किराणा दुकानदारांनी दुकाने उघडली नाहीत. मद्य विक्रीच्या दुकानदारांनीदेखील तातडीने बंदला पाठिंबा दिला. एसटी विभागासह खासगी लक्झरी संचालकांनी लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या नाहीत. काळी-पिवळीसह ऑटोचालकांनी आपली वाहने रस्त्यावर आणली नाहीत. हॉटेल्स, किरकोळ नाश्त्याचे ठेले बंद होते, चहा टपर्या, लघू व्यावसायिकांची उलाढाल थांबली. बँकांतून होणारी मोठी उलाढाल होऊ शकली नाही. अशी एकंदरित जिल्हय़ातील उलाढालीची आकडेवारी काढली असता, बुधवारी एका दिवसात ६0 कोटींची उलाढाल ठप्प राहिली. ही माहिती अकोला चेंबर्स ऑफ कॉर्मसच्या दोन पदाधिकार्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.