हैदराबादहून आलेल्या ६० मजुरांना अडविले अकोल्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:15 PM2020-04-03T12:15:30+5:302020-04-03T12:15:37+5:30
अडविण्यात आलेल्या सर्व मजुरांची गुरुवारी महानगरपालिका वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली.
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ असताना हैदराबाद येथून मध्य प्रदेशातील मुरेनाकडे जात असलेल्या ६० मजुरांना बुधवारी रात्री अकोल्यात अडविण्यात आले असून, शहरातील खडकी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन येथे जिल्हा प्रशासनामार्फत त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. अडविण्यात आलेल्या सर्व मजुरांची गुरुवारी महानगरपालिका वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली.
एका ट्रकद्वारे हैदराबाद येथून मध्य प्रदेशातील मुरेना या गावाकडे जात असलेल्या ६० मजुरांना १ एप्रिल रोजी सायंकाळी पातूर येथे पोलिसांनी अडविले व अकोल्यात आणले. रात्री १० वाजताच्या दरम्यान अकोल्यात आणलेल्या या मजुरांची अकोल्याचे उपविभागीय अधिकारी नीलेश अपार व तहसीलदार विजय लोखंडे यांनी माहिती घेतली. मध्य प्रदेशातील मुरेना या गावी जाण्यासाठी मजुरांकडून करण्यात आलेली मागणी प्रशासनाकडून अमान्य करण्यात आली व अकोल्यातच थांबण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. त्यानुसार अकोल्यातील खडकी भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन येथे ६० मजुरांच्या निवास व भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आली. गुरुवार, २ एप्रिल रोजी महानगरपालिका वैद्यकीय पथकामार्फत या मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कपड्यांचे केले वितरण!
हैदराबादहून मध्य प्रदेशातील आपल्या गावाकडे जात असलेल्या या मजुरांना अकोल्यात अडविण्यात आले. अंगावर व्यवस्थित कपडे नसल्याने त्यांच्या मागणीनुसार गुरुवारी जिल्हा प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्यावतीने ६० मजुरांना आवश्यक कपड्यांचे वितरणही करण्यात आले.