६२ आजी-माजी ग्रामसेवकांनी थकविले तीन कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:24 PM2018-12-14T13:24:47+5:302018-12-14T13:24:59+5:30
अकोला : अकोला-वाशिम जिल्ह्यातील ६२ आजी-माजी ग्रामसेवकांनी तीन कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याने अकोला जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेने त्यांना जंगम मालमत्ता जप्तीची नोटीस पाठविली आहे.
- संजय खांडेकर
अकोला : अकोला-वाशिम जिल्ह्यातील ६२ आजी-माजी ग्रामसेवकांनी तीन कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याने अकोला जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेने त्यांना जंगम मालमत्ता जप्तीची नोटीस पाठविली आहे. नोटीस पाठविण्यासोबतच वृत्तपत्रातून थकीतदारांची नावे, रक्कम आणि मालमत्ता जाहीर केल्याने अकोला आणि वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
अकोला-वाशिम जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ग्रामसेवकांची नोंदणीकृत पतसंस्था गत अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. अकोल्याच्या राजपूत पुरा परिसरातील देवराव बाबा चाळीतून अकोला जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे कामकाज चालते. दोन्ही जिल्ह्यांत ३७५ सभासद असून, आजी-माजी ग्रामसेवक असलेल्यांना कर्ज पुरवठा केला जातो. या पतसंस्थेतून १६१ च्यावर सभासदांनी कोट्यवधींचे कर्ज घेतले आहे. यातील जवळपास ६२ आजी-माजी ग्रामसेवकांनी अनेक वर्षांपासून कर्जाची परतफेड केलेली नाही. अशा ६२ आजी-माजी ग्रामसेवकांची नावे पतसंस्थेने काळ्या यादीत टाकली असून, त्यांची कर्ज प्रकरणे सहकारी आणि न्यायालयात ठेवली आहेत. शेवटचा पर्याय म्हणून आता पतसंस्थेने ६२ आजी-माजी ग्रामसेवकांच्या मालमत्तेची जप्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी वृत्तपत्रात जाहीर नोटीस देऊन २६ कर्ज थकविणाऱ्यांची माहिती प्रकाशित केली आहे. पहिली यादी जाहीर झाली असून, आणखी चार याद्या जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
-वारंवार सूचना देऊनही कोणताच परिणाम सभासदांवर होत नसल्याने पर्यायाने पतसंस्थेने जंगम मालमत्ता जप्ती कारवाई सुरू केली आहे. पतसंस्थेने कायदेशीर मार्ग अवलंबिला आहे.
-साहेबराव चव्हाण, अध्यक्ष, जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था, अकोला.
-समुपदेशन करून पतसंस्थेने ग्रामसेवक सभासदांकडून वसुली करायला हवी, नावे प्रकाशित करायला नको कायदेशीर असले, तरी ही पद्धत चुकीची आहे. कौटुंबिक अडचणी समजून घेतल्या पाहिजेत.
-उल्हास मोकळकर, माजी अध्यक्ष, जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था, अकोला.
*दोन कोटींची उलाढाल...
शेकडो सभासद असलेल्या जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची दोन कोटींची वार्षिक उलाढाल असून, पतसंस्था नफ्यात आहे. काही सभासदांचा मृत्यू झाल्याने त्यातील काही परिवाराकडून वसुली जवळ-जवळ अशक्य आहे. अशांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, असा सूर समोर येत आहे.