फवारणीतून ६२ जणांना विषबाधा; एकाचा बळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:59 AM2020-08-28T10:59:37+5:302020-08-28T11:00:21+5:30
४७ वर्षीय शेतमजुराचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: गत दीड महिन्यात सर्वोपचार रुग्णालयात कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झालेल्या ६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. फवारणीतून विषबाधेचे प्रमाण वाढत आहे. अशातच बाळापूर तालुक्यातील बटवाडी बु. येथील ४७ वर्षीय शेतमजुराचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यात कपाशीसह इतर पिकांंवर कीटकनाशक फवारणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे फवारणीतून विषबाधेचे प्रमाणही वाढले आहे.
सर्वोपचार रुग्णालयात दिवसाला दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये सरासरी चार ते पाच रुग्ण हे फवारणीतून विषबाधा झालेले असतात. फवारणीतून विषबाधा झालेल्या ६२ जणांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.
यामध्ये अकोल्यासह वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यातील गोळेगाव (ता.जळगाव जामोद) येथील ३१ वर्षीय युवा शेतकºयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
प्राथमिक माहितीनुसार, या रुग्णाने विष प्राशन केल्याचे सांगण्यात येत असून, त्या रुग्णाचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे वैद्यकीय सूत्रांचे मत आहे. पश्चिम विदर्भात अकोल्यासह बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातून विषबाधा झालेले रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होतात.
सद्यस्थितीत सौम्य आणि मध्यम प्रभावातील रुग्ण दाखल होतात. हा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती सुरक्षात्मक खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
दोघांची प्रकृती चिंताजनक
सर्वोपचार रुग्णालयात दाखल फवारणीतून विषबाधेच्या रुग्णांमध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या दोन्ही रुग्णांना ‘आयसीयु’मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
विषबाधेचे इतरही रुग्ण!
सध्या फवारणीतून विषबाधा झालेले चार ते पाच रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत आहेत. याच प्रमाणात विषप्राशन करणाºया रुग्णांचाही समावेश आहे. म्हणजेच सर्वोपचार रुग्णालयात दिवसाला सरासरी आठ ते दहा रुग्ण हे विषबाधेचे दाखल होतात.