अकोल्यात ६३.४४ टक्के मतदान !

By admin | Published: February 4, 2017 02:41 AM2017-02-04T02:41:58+5:302017-02-04T02:41:58+5:30

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये बंद.

63.44 percent polling in Akola! | अकोल्यात ६३.४४ टक्के मतदान !

अकोल्यात ६३.४४ टक्के मतदान !

Next

अकोला, दि. 0३- अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात सातही तालुक्यांतील ६६ मतदान केंद्रांवर सरासरी ६३.४४ टक्के मतदान झाले असून, निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले आहे.
विधान परिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांचा समावेश आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदारसंघातील पाचही जिल्ह्यांत २८0 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांतील ६६ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात एकूण ४७ हजार १५२ मतदार असूून, त्यापैकी ३९ हजार ९१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये २0 हजार ५६४ पुरुष आणि ९ हजार ३४९ स्त्री पदवीधर मतदारांनी मतदान केले. त्यामुळे या निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ६३.४४ टक्के मतदान झाले. मतदानानंतर अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातील भाजपचे डॉ. रणजित पाटील, काँग्रेसचे संजय खोडके, प्राउडिस्ट ब्लॉक इंडियाचे दिलीप सुरोशे, रिपब्लिकन सेनेच्या नीता गहरवाल यांच्यासह अँड. अरुण आंबेडकर, डॉ. अविनाश चौधरी, गणेश तायडे, अँड. संतोष गावंडे, जितेंद्र जैन, डॉ. दीपक घोटे, डॉ. लतीश देशमुख, प्रशांत काटे व प्रा. प्रशांत वानखडे इत्यादी १३ उमेदवारांचे भाग्य मतपेट्यांमध्ये सीलबंद झाले.

मतपेट्या अमरावतीला रवाना!
अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अमरावती येथे होणार आहे. त्यानुषंगाने मतदानानंतर जिल्ह्यातील ६६ मतदान केंद्रांवर सीलबंद करण्यात आलेल्या मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्या. त्यानंतर शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अमरावती येथे रवाना करण्यात आल्या.

मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ६६ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पदवीधर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

सोमवारी फैसला!
अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, ६ फेब्रुवारी रोजी अमरावती येथे होणार आहे. या मतमोजणीत मतपेट्यांमध्ये सीलबंद झालेल्या १३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी बजावला मतदानाचा हक्क; केंद्रांची केली पाहणी !
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अकोल्यातील मुंगीलाल बाजोरिया विद्यालय या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी शहरातील आरएलटी, एलआरटी व आरडीजी महाविद्यालय इत्यादी तीन मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली.

Web Title: 63.44 percent polling in Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.