पावसाळ्यातही ६४ गावांना पंधरा दिवसाआड पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 02:52 PM2019-07-17T14:52:22+5:302019-07-17T14:52:37+5:30
जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
- संतोष येलकर
अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पंधरा दिवस पुरेल एवढे पाणी साठवून ठेवणे अशक्य असल्याने, पावसाळ्यातही तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.
यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यात अद्यापही सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यांत वाढ झाली नसून, नदी-नाले कोरडे पडले आहेत. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात पावसाळ्यातही पाणीटंचाईची समस्या कायम आहे. महान येथील काटेपूर्णा धरणातून अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या पृष्ठभूमीवर आवश्यकतेनुसार या धरणातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी सोडण्यात येत आहे. या योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी गत आठवड्यात महान येथील काटेपूर्णा धरणातून १ दशलक्ष घनमीटर पाणी खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यात सोडण्यात आले. उपलब्ध जलसाठ्यातून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना सध्या १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे; मात्र १५ दिवसांतून एकदा मिळणारे पाणी पिण्यासाठी साठवून ठेवणे अशक्य असल्याने, पावसाळ्यातही तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याकरिता ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. विहीर, बोअर आणि नदी-नाल्यातील झिºयातील पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. तर काहींना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत असल्याची स्थिती आहे.
उन्नई बंधाºयात महिनाभर पुरेल एवढा जलसाठा!
खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाºयात पाणी सोडले जाते. गत आठवड्यात या बंधाºयात १ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले असून, त्यामधून गावांना सध्या १५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यानुसार ६४ गावांना महिनाभर पुरेल एवढा जलसाठा उन्नई बंधाºयात उपलब्ध आहे.
खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना सध्या पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यानुसार योजनेंतर्गत गावांना महिनाभर पाणीपुरवठा होऊ शकेल एवढा जलसाठा उन्नई बंधाºयात उपलब्ध आहे.
- अनिल चव्हाण
शाखा अभियंता, जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा, उपविभाग, अकोला.