मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ६४६ अर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:27 PM2019-07-29T12:27:56+5:302019-07-29T12:28:03+5:30
रविवार, २८ जुलै रोजी जिल्ह्यात मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी ६४६ नवमतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) अर्ज सादर केले.
अकोला : मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मतदार यादीत नावे नोंदणीसाठी २०, २१, २७ व २८ जुलै असे चार दिवस विशेष मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेच्या शेवटच्या दिवशी रविवार, २८ जुलै रोजी जिल्ह्यात मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी ६४६ नवमतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) अर्ज सादर केले.
गत १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांची मतदार यादीत नोंदणी झाली नाही, अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात २०, २१, २७ व २८ जुलै असे चार दिवस मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेच्या शेवटच्या दिवशी २८ जुलै रोजी जिल्ह्यातील १ हजार ६८० मतदान केंद्रांवर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे, मतदार यादीतील दुबार, स्थलांतरित व मयत मतदारांची नावे वगळणे, नावात दुरुस्ती व पत्त्यात दुरुस्ती संदर्भात मतदारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत मतदार यादीत नावे नोंदणीसाठी ६४६ नवमतदारांकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करण्यात आले.