अकोला जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे ६४९.३५ कोटींची थकबाकी
By atul.jaiswal | Published: November 19, 2020 07:00 AM2020-11-19T07:00:00+5:302020-11-19T07:00:11+5:30
Akola MSEDCL News जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल ६४९.३५ कोटींची थकबाकी आहे.
अकोला : वीज देयकांची वसुली होत नसल्याने महावितरणचा थकबाकीचा डोंगर वाढला असून, जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल ६४९.३५ कोटींची थकबाकी आहे. थकबाकीदारांमध्ये कृषीपंपधारकांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील एकूण ४ लाख २३ हजार ४८ वीजग्राहक असून, बहुतांश ग्राहकांकडे वीज देयकांची थकबाकी आहे.
लॉकडाऊननंतरच्या काळात वीज वितरण कंपनीकडे वीज ग्राहकांची थकबाकी वाढली आहे. अवास्तव बिल आल्याचा आरोप ग्राहकांकडून झाला. यावर मार्गदर्शन करणारे ऑनलाइन चर्चासत्रही झाले. यामुळे वसुलीची मोहीम वेग धरत असतानाच कृषीमंत्र्यांकडून शंभर युनिटच्या आतमधील ग्राहकांना सवलत देण्याची घोषणा झाली. दिवाळीपूर्वी यावर निर्णय होणार होता. प्रत्यक्षात यासंदर्भात कुठलाही आदेश पुढे आला नाही. तर दुसरीकडे वीज कंपनीकडील थकबाकीचे प्रमाण वाढत गेले आहे. जिल्ह्यात वीज कंपनीकडे १६९६ कोटी ५१ लाखांची थकबाकी आहे. लॉकडाऊननंतरच्या काळात वीज वितरण कंपनीकडे वीज ग्राहकांची थकबाकी वाढली आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे ६४९.३५ कोटींची थकबाकी आहे.
वीजचोरीवर उपाय
वीज तारांवर आकोडे टाकून होणारी चोरी टाळण्यासाठी केबलच्या माध्यमातून वीज पुरवठा होत आहे.
वीज चोरी पकडण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.
वीज चोरी होऊ नये म्हणून मीटर बाहेरच्या भागात लावण्यात आले आहे.
याशिवाय जुने मीटर बदलविले जात आहे.
कृषीपंपधारकांनी थकविले ५३० कोटी
जिल्ह्यात औद्योगिक ग्राहकांकडे ८ कोटी ८५ लाखांची थकबाकी आहे. घरगुती ग्राहकांकडे ९८ कोटींची थकबाकी आहे. तर कृषी पंपधारकांकडे ५३० कोटींची थकबाकी आहे. कृषीपंपधारकांकडे सर्वाधिक थकबाकी राहिली आहे. वसुलीसाठी वीज कंपनीला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे.
कृषिपंपावर भारनियमन
विजेचे वितरण करताना कृषीपंपांना तीन दिवस दिवसा आणि तीन दिवस मध्यरात्रीनंतर वीज पुरवठा करण्याचे वेळापत्रक वीज कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून जाहीर झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत कृषी पंपांवर सिंचनासाठी रात्रीला जागल करावी लागत आहे. त्यामुळेच दिवसा सिंचनासाठी वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
पाच गावांमध्ये वीजच नाही
मेळघाटातून तेल्हारा तालुक्यात पुनर्वसित झालेल्या मौजे तलई, सोमठाणा खुर्द, बोरव्हा, गायरान, चुनखडी या गावांमध्ये अद्याप वीज पोहोचली नाही. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने लवकरच या गावामध्ये वीज पुरवठा केला जाणार आहे.
लॉकडाऊन काळातही महावितरणने अखंडित वीज पुरवठा केला. नागरिकांनी वीज बिल भरून सहकार्य केले पाहिजे. जेणेकरून आगामी काळातही वीज ग्राहकांना अखंडित सेवा देता येईल.
पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता, महावितरण, अकोला.
असे आहेत ग्राहक
घरगुती : ३,२७,२९४
वाणिज्यिक : २६७६७
औद्योगिक : ५२९८
कृषी : ६३६८९
रोजचा वीज वापर : १.७७ मिलीयन युनिट