गरिबांसाठी गरिबांना मोफत वाटपासाठी ६५ हजार क्विंटल धान्याची उचल सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:17 AM2021-05-10T04:17:55+5:302021-05-10T04:17:55+5:30
अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य ...
अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत गरीब रेशन कार्डधारक कुटुंबांना १५ मेपासून धान्याचे मोफत वाटप सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ६५ हजार १०७ क्विंटल धान्याची उचल ४ मेपासून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेता, राज्यात १४ एप्रिलपासून शासनामार्फत कडक निर्बंध लागू करण्यात आले. कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने, सार्वजिनक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत गरीब रेशन कार्डधारक कुटुंबांना एक महिन्यात मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा राज्य सरकारने १३ एप्रिल रोजी केली होती. त्यानुसार प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना प्रति व्यक्ती पाच किलो आणि अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्डधारकांना प्रति कुटुंब ३५ किलो मोफत धान्याचे वाटप १ मेपासून सुरू करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ इत्यादी धान्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गरीब रेशन कार्डधारक लाभार्थींना १५ मेपासून रास्त भाव धान्य दुकानांमधून मोफत धान्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ६५ हजार १०७ क्विंटल धान्याची उचल जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यासाठी अशी आहे
धान्यसाठ्याची मागणी !
धान्य क्विंटल
गहू ३८७८०
तांदूळ २६३२७
................................................
एकूण ६५१०७
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मे व जून महिन्यात जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचे वितरण करण्यात आले आहे. त्यासाठी गहू व तांदूळ इत्यादी धान्याची उचल सुरू करण्यात आली आहे.
-बी.यू. काळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी