पश्चिम विदर्भात ६६ कांदा चाळींची उभारणी
By admin | Published: May 28, 2016 01:48 AM2016-05-28T01:48:27+5:302016-05-28T01:48:27+5:30
कांदा चाळ शेतक-यांसाठी आधार : १ हजार ६५0 मेट्रिक टन कांद्याची साठवण.
ब्रम्हानंद जाधव/मेहकर (जि. बुलडाणा)
राज्यात मागील वर्षी जवळपास सात लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन झाले होते. कांदा उत्पादनात सातत्याने वाढ होत असून, योग्य प्रकारे साठवण न केल्यास ५0 ते ६0 टक्क्यांपर्यंत कांद्याचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि कांदा जास्त काळ टिकवण्यासाठी कांदा चाळ योजना राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षभरामध्ये पश्चिम विदर्भात ६६ कांदा चाळींची उभारणी करण्यात आली असून, यामध्ये १ हजार ६५0 मेट्रिक टन कांद्याची साठवणूक झाली आहे.
आधीच निसर्गाची अवकृपा आहे. त्यात कसाबसा जगवलेला कांदा दुष्काळात आधार देईल, अशी भावना मनात असताना कांद्याच्या कोसळलेल्या दराने शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. एकेकाळी कांद्याच्या गगनाला भिडणार्या किमतीमुळे नागरिकांवर रडण्याची वेळ आली होती; मात्र आता कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. ठोक बाजारात कांद्याची किंमत जवळपास ५00 रुपये क्विंटलवर येऊन पोहोचली आहे. सध्या व्यापार्यांकडून केवळ चार ते पाच रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. त्यामध्ये कांदा उत्पादनासाठी शेतकर्यांना लागलेला खर्चही भरून निघणार नाही. कांदा हे नाशवंत पीक आहे. त्याला शास्त्रोक्त पद्धतीने साठवले नाही, तर त्याची नासाडी होते. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात कांदा विक्री करतात; परंतु कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी आणि तो जास्त काळ टिकवण्यासाठी कांदा चाळीचा योग्य पर्याय शेतकर्यांपुढे आहे. कांदा चाळ उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. कांद्याचे दर वाढणे किंवा अचानक कमी होणे याचे एक कारण कांद्याच्या साठवणक्षमतेत आहे. आजही बहुतांश शेतकरी कांदा चाळ योजनेचा लाभ घेताना दिसत नाहीत. त्याचा फटका बाजारभावातील चढ-उतारात सगळ्यांनाच बसतो. कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी ६0 टक्के कांदा हा रब्बी हंगामात म्हणजेच एप्रिल ते मेमध्ये तयार होत असून, सध्या बाजारात नवीन कांदा आलेला आहे. एकाच वेळी हा कांदा बाजारात आला की, भाव पडतात; पण तो दोन-तीन महिने कांदा चाळीत साठवला, तर जून ते ऑक्टोबरपर्यंत टिकतो. या काळात कांद्याला चांगला दर मिळतो.