रद्द झालेल्या ६६२ सिंचन विहिरींची कामे पुन्हा करणार!
By admin | Published: November 25, 2015 02:18 AM2015-11-25T02:18:40+5:302015-11-25T02:18:40+5:30
पाच तालुक्यांतील लाभार्थ्यांचा समावेश.
अकोला: राज्य रोजगार हमी योजना आणि धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत रद्द करण्यात आलेल्या ६६२ सिंचन विहिरींची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) परत सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील लाभार्थी शेतकर्यांची संमती घेण्यात आली. राज्य रोजगार हमी योजना आणि धडक सिंचन विहीर योजना अंतर्गत मंजूर सिंचन विहिरींची कामे अग्रिम देऊनही सुरु करण्यात आली नव्हती. जिल्ह्यातील अशा ६६२ सिंचन विहिरींची कामे जिल्हा प्रशासनामार्फत रद्द करण्यात आली होती. सिंचन विहिरींचा अनुशेष भरून काढण्यासाठी रद्द करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची कामे नव्याने सुरू करण्याचे निर्देश शासनामार्फत जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. त्यानुसार या सिंचन विहिरींची कामे परत सुरू करण्यासाठी संबंधित शेतकर्यांची संमती घेऊन, लाभार्थी शेतकर्यांच्या याद्या जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार तयार करण्यात आल्या आहेत. गटविकास अधिकार्यांनी त्यानुसार पाच तालुक्यांतील रद्द करण्यात आलेल्या ६६२ सिंचन विहिरींची कामे सुरू करण्याबाबत संबंधित लाभार्थी शेतकर्यांची संमती घेऊन पात्र लाभार्थ्यांंची यादी जिल्हा प्रशासनाकडे सोपविली आहे. पात्र लाभार्थींमध्ये आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील शेतकर्यांचा समावेश आहे.
दोन तालुक्यांतील रद्द
विहिरींची माहितीच नाही! रद्द करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची कामे परत सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील रद्द विहिरींची माहिती पंचायत समित्यांकडून प्राप्त झाली असली तरी अकोला व तेल्हारा या दोन तालुक्यांतील रद्द करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची माहिती या दोन्ही पंचायत समित्यांकडून २४ नोव्हेंबरपर्यंंत जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो विभागाकडे प्राप्त झाली नाही.
रद्द विहिरींची माहिती आयुक्तांकडे!
जिल्ह्यातील रद्द करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची कामे परत सुरू करण्यासाठी संमती घेण्यात आलेल्या जिल्ह्यातील पाच समित्यांमार्फत प्राप्त माहितीच्या आधारे ६६२ रद्द सिंचन विहिरींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो विभागामार्फत २३ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या रोहयो विभागाकडे सादर करण्यात आली.