६७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ई-ओपनिंग
By admin | Published: April 7, 2017 01:10 AM2017-04-07T01:10:04+5:302017-04-07T01:10:04+5:30
मनपा आयुक्तांनी घेतली आढावा बैठक : योजनेची माहिती अपलोड करण्याचे निर्देश
अकोला : अकोला महानगरातील ८७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे ई-ओपनिंग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस करणार असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी महापालिकेची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी आढावा बैठक घेऊन पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील जुजबी माहिती तातडीने अपलोड करण्याच्या सूचना मनपा जलप्रदाय विभागाचे अभियंता सुरेश हुंगे यांना दिल्या आहेत. आगामी दहा दिवसांच्या आत मुख्यमंत्री तब्बल चार हजार कोटींच्या विकास कामांचे ई-ओपनिंग मुंबई मंत्रालयातून करणार आहेत. त्यामध्ये अकोला महापालिकेतील ८७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या विकास कामांचा समावेश राहणार आहे.
अकोला महापालिकेतील पाणीपुरवठा समस्या दूर करण्यासाठी आठ ठिकाणी जलकुंभाची निर्मिती करणे, महानगरातील २६० कि.मी. अंतराच्या जुन्या पाणीपुरवठा पाइपलाइनची दुरुस्ती करणे आणि १६० कि.मी. अंतराची नवीन पाइपलाइन टाकण्याच्या निविदेला आधीच मंजुरी मिळाली आहे. या निविदेतील करार, बँक गॅरंटी आणि प्रत्यक्ष कामकाज लवकरच सुरू होणार आहे. ८७ कोटींच्या निधीतून होणाऱ्या या विकास कामांचा लोकार्पण सोहळा यंदा मुख्यमंंत्री मुंबईतून करणार असून, त्याची थेट व्हीसी अकोला महापालिकेशी जोडलेली राहणार आहे. येत्या दहा दिवसांत होणाऱ्या या ई-लोकार्पण सोहळ्याची तयारी महापालिकेत सुरू असून, यासाठी मनपा आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके व हुंगे आदी पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.