जिल्ह्यातील ६७ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:13 AM2021-07-05T04:13:48+5:302021-07-05T04:13:48+5:30
अकोला : जुलै महिना उजाडला तरी पीक कर्जाच्या वाटपाला गती मिळाली नाही. जिल्ह्यात ३० जूनपर्यंत ५७ टक्के पीक कर्जवाटप ...
अकोला : जुलै महिना उजाडला तरी पीक कर्जाच्या वाटपाला गती मिळाली नाही. जिल्ह्यात ३० जूनपर्यंत ५७ टक्के पीक कर्जवाटप झाले आहे; परंतु अद्यापही ६७ हजार ४९९ शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करण्यात आले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा लागली आहे.
काेराेनामुळे गत वर्षीपासून शेतकरी संकटात सापडलेले आहेत. शेतमाल विकण्याच्या वेळीच निर्बंध लावण्यात येत असल्याने भाव मिळाला नाही. यावर्षीही तीच परिस्थिती हाेती. २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे नगदी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. हाताताेंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला हाेता. या नुकसानीतून सावरत शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली. पीक कर्ज मिळेल या आशेने जिल्ह्यातील शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत आहेत; मात्र त्यांना पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यावर्षी १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना ११४० काेटी रुपयांचे कर्जवाटप करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले हाेते. त्यापैकी ३० जूनपर्यंत केवळ ७५ हजार १ शेतकऱ्यांना ६८५ काेेटी २२ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. ५० टक्के शेतकऱ्यांना हे कर्जवाटप करण्यात आले असून, ५० टक्क्यांच्या जवळपास शेतकरी अजूनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.
राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता
पीक कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टानुसार पीक कर्जाचे वितरण हाेत नसल्याचे चित्र आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना खरिपात ४२३ कोटी ७२ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी १५६ कोटी १७ लाख रुपये कर्जवाटप झाले. उद्दिष्टाच्या केवळ ३५ टक्के वाटप झाले आहे.
पीक कर्जवाटपात जिल्हा सहकारी बँक अव्वल
इतर बँकांमधून कर्जवाटप कमी प्रमाणात झाले असले तरी जिल्हा मध्यवर्तीय सहकारी बँकेकडून सर्वाधिक ७८ टक्के पीक कर्जवाटप केले आहे. या बँकेला ५५१ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ४५१ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
मृग नक्षत्राच्या पावसावर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली हाेती. त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पीक कर्ज मिळेल, या आशेवर अनेकांनी उसनवारी करून पेरणी केली. त्यातच दुबार पेरणी करावी लागल्यास पुन्हा बियाणे, खते कशी विकत आणावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट
११४० कोटी
झालेले पीक कर्जवाटप
६८५ कोटी
बँकनिहाय कर्जवाटप
सार्वजनिक क्षेत्रातील बँक
१५६ कोटी १७ लाख
खासगी क्षेत्रातील बँक
३ कोटी ७८ लाख
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
४५१ कोटी
विदर्भ कोकण ग्रामीण बँक
७४ कोटी २७ लाख