६८ काेटी रुपयांतून शहरात विकास कामांचा धडाका; हद्दवाढ क्षेत्रात २८ काेटीतून मुलभूत सुविधांची कामे
By आशीष गावंडे | Published: October 19, 2023 05:09 PM2023-10-19T17:09:49+5:302023-10-19T17:09:58+5:30
मनपाच्या बांधकाम विभागाने संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश जारी केल्यानंतर कंत्राटदारांनी कामांचा धडाका लावल्याचे चित्र आहे.
अकाेला: राज्य शासनाकडून महापालिका प्रशासनाला प्राप्त झालेल्या ६८ काेटी रुपयांतून शहरात विविध विकास कामांना सुरुवात झाल्याचे दिसत आहे. सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजना तसेच दलितेत्तर याेजनेंतर्गत मनपाला ३२ काेटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यामध्ये मनपा प्रशासनाने ३० टक्के आर्थिक हिस्सा जमा केला असता सुमारे ४० काेटी रुपये तसेच याव्यतिरिक्त २८ काेटी रुपये निधीतून हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामे निकाली काढल्या जाणार आहेत. मनपाच्या बांधकाम विभागाने संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश जारी केल्यानंतर कंत्राटदारांनी कामांचा धडाका लावल्याचे चित्र आहे.
महापालिका क्षेत्रात रस्ते, नाल्या, पथदिवे, पाणीपुरवठा, उद्यानांचे साैंदर्यीकरण, पेव्हर ब्लाॅक आदी विकास कामे निकाली काढण्यासाठी राज्य शासनाकडून सुवर्ण जयंती नगराेत्थान याेजना, नागरी दलित वस्ती सुधार याेजना तसेच दलितेत्तर याेजनेंतर्गत निधी प्राप्त हाेताे. नगराेत्थान व दलितेत्तर याेजनेंतर्गत प्राप्त झालेल्या निधीत मनपाला ३० टक्के आर्थिक हिस्सा जमा करावा लागताे.
दरम्यान, महापालिका क्षेत्रातील रस्ते, नाल्या व धाप्यांची कामे अतिशय दर्जाहिन हाेत असताना अशी दर्जाहिन कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत न टाकता त्यांची प्रशासनाच्या स्तरावर पाठराखण हाेत आहे. दरम्यान, मनपाला नगराेत्थान व दलितेत्तर याेजनेंतर्गत ३२ काेटी रुपये निधी प्राप्त झाला. यामध्ये मनपाने ३० टक्के आर्थिक हिस्सा जमा करत ४० काेटी रुपयांतून विकास कामांचे नियाेजन केले.
भाजपच्या माजी नगरसेवकांना झुकते माप
वर्तमानस्थितीत महापालिका बरखास्त असली तरीही प्रभाग निहाय विकास कामांचे प्रस्ताव तयार करणे, त्यासाठी निधीची तरतूद करणे आदी कामे तत्कालीन सत्तापक्षातील प्रभावी पदाधिकारी विजय अग्रवाल यांच्या सूचनेनुसारच निकाली काढली जात आहेत. ४० काेटी रुपयांच्या कामात प्रशासनाने केवळ १२ काेटी रुपयांची कामे सुचविली आहेत. या विकास कामांमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांना झुकते माप दिल्याचे दिसत आहे. यावरुन प्रशासनावर आजही भाजपचीच पकड असल्याचे दिसून येते.
कनिष्ठ अभियंत्यांची दमछाक
हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांसाठी भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन २८ काेटींचा निधी मिळवला. यामुळे शहरात एकूण ६८ काेटींची विकास कामे निकाली काढताना चारही झाेनमधील कनिष्ठ अभियंत्यांची दमछाक हाेत आहे. तर काही अभियंत्यांना कामे समजावून सांगताना माजी नगरसेवकांच्या ताेंडाला फेस आल्याची परिस्थिती आहे.