सायबर क्राईमचे महाराष्ट्रात ६८१ गुन्हे!
By admin | Published: December 2, 2014 11:40 PM2014-12-02T23:40:39+5:302014-12-02T23:40:39+5:30
२0१३ साली सर्वाधिक गुन्हे पुण्यात.
नितीन गव्हाळे /अकोला
महाराष्ट्रात २0१३ साली सायबर क्राईमशी संबंधित ६८१ गुन्हे घडले. सर्वाधिक गुन्हे पुण्यात, तर त्याखालोखाल यवतमाळात अशा प्रकरणांची नोंद करण्यात आली. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने राज्यातील सायबर क्राईमबाबत अलिकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही आकडेवारी दिली आहे.
सोशल नेटवर्किंग साईटसवर बनावट प्रोफाईल तयार करणे, त्या माध्यातून इतरांना मानसिक त्रास देणे, धार्मिक भावना दुखावणे, महापुरुषांचे आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड करणे, अश्लील कॉमेंटस करून भावना दुखावणे आदी प्रकार अलिकडे वाढत आहेत. एवढेच नव्हे तर इंटरनेट बँकिगच्या माध्यमातून बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकारही सातत्याने घडत आहेत. वाढते सायबर क्राईम समाजासाठी एक चिंतेची बाब ठरत असताना, २0१३ साली या प्रकारचे सर्वाधिक ९७ गुन्हे पूणे शहरामध्ये नोंदविण्यात आले. त्याखालोखाल यवतमाळ जिल्हय़ात ६१, तर ठाण्यात २0 गुन्हय़ांची नोंद आहे.
*माहिती तंत्रज्ञान कायद्यातर्गंत नोंदविलेले गुन्हे
पूणे शहर ९७
यवतमाळ ६१
ठाणे शहर ५२
औरंगाबाद शहर ४७
मुंबई ४0
नवी मुंबई ३१
ठाणे ग्रामीण २४
अकोला २0
*इंटरनेटद्वारे फसवणूक, मुंबई अव्वल
इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याचे सर्वाधिक ९२ गुन्हे मुंबई शहरात घडले. त्याखालोखाल ठाणेमध्ये ७३, नवी मुंबई शहरामध्ये २0 गुन्हे घडले.
*तरूण आरोपींचा भरणा
माहिती व तंत्रज्ञानाचा गैरवापर करून आर्थिक लुबाडणूक करणे, अश्लील फोटो टाकणे, संवाद साधणे, मानसिक त्रास देणे आदी प्रकार करणार्या आरोपींमध्ये ३0 ते ४५ वयोगटातील तरूणांची संख्या ९३ आहे. १८ ते ३0 वर्ष वयोगटातील युवकांची संख्या ६४ आहे. ४५ ते ६0 वर्ष वयोगटातील १९, तर ६0 वर्षावरील गुन्हेगाराची संख्या १ आहे.