शेवटच्या दिवशी ६८८ उमेदवारी अर्ज दाखल !
By admin | Published: February 4, 2017 02:26 AM2017-02-04T02:26:35+5:302017-02-04T02:26:35+5:30
सर्व्हर डाउन; उमेदवारांची धावपळ!
अकोला, दि. 0४- उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (३ फेब्रुवारी) पाच झोन कार्यालयांमध्ये एकूण ६८८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजपर्यंंत निवडणूक विभागाकडे ८८१ अर्ज प्राप्त झाले. उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असल्यामुळे निवडणूक लढविणार्या इच्छुकांची एकच गर्दी झाली होती.
महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पारदश्री व सोपी व्हावी, या उद्देशातून निवडणूक आयोगाने यावेळी प्रथमच ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धत अवलंबिली; परंतु निवडणूक विभागाच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया काही काळासाठी संथगतीने सुरू होती. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला होता. त्यामुळे ही पद्धत उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरली. शेवटच्या दिवशी, शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंंत ६८८ उमेदवारांचे अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले. प्रभाग १५ मध्ये एका अपक्ष उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून १0 रुपयाचे पाच हजार किमतीचे शिक्के निवडणुक अधिकार्याकडे जमा केले.
सर्व्हरवरील ताण वाढला !
महापालिका निवडणुकीचा अर्ज यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने भरावा लागला. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंंतच्या अवघ्या चार तासांच्या कालावधीत उमेदवारांना अर्ज सादर करावे लागले. ऑनलाइन उमेदवारी अर्जाची प्रिंट आउट काढून निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर करताना अनेकांना चांगलीच कसरत करावी लागली. शेवटच्या दिवशी संबंधित वेबसाइटवर अर्ज सादर करणार्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सर्व्हरवरील ताण वाढला. त्यामुळे काही काळासाठी अर्ज भरण्याची गती संथ झाली होती.
आज उमेदवारी अर्जांंची छाननी
मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या स्तरावर ४ फेब्रुवारी रोजी प्राप्त अर्जांंंची छाननी केली जाणार आहे. छाननी केल्यानंतर याच दिवशी सायंकाळपर्यंंत इच्छुक उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
उमेदवारी मागे घेतो कोण?
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने उमेदवारांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज मागे घेऊ शकतात. यासाठी ७ फेब्रुवारी तारिख निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणात कायम राहणार्या उमेदवारांची अंतिम यादी ८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल. यावेळी उमेदवारी अर्ज मागे कोण घेतो, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.