६९ गावातील पाणीपुरवठा योजना; स्थगिती उठवण्यासाठी शिवसेनेचा अकोला ते नागपूर पायी मोर्चा

By आशीष गावंडे | Published: April 10, 2023 06:35 PM2023-04-10T18:35:27+5:302023-04-10T18:36:01+5:30

बाळापूर विधानसभा संघातील खारपाणपट्ट्यात गोड पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना नाइलाजाने खारेपाणी प्यावे लागत आहे.

69 Village Water Supply Schemes Shiv Sena foot march from Akola to Nagpur to lift moratorium | ६९ गावातील पाणीपुरवठा योजना; स्थगिती उठवण्यासाठी शिवसेनेचा अकोला ते नागपूर पायी मोर्चा

६९ गावातील पाणीपुरवठा योजना; स्थगिती उठवण्यासाठी शिवसेनेचा अकोला ते नागपूर पायी मोर्चा

googlenewsNext

अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळापुर मतदार संघातील ६९ गावांना होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्यामुळे शिवसेनेचे (ठाकरे गट)जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी अकोला ते नागपूर पायदळ मोर्चाला सुरुवात करण्यात आली. शहराचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिरातून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला.

बाळापूर विधानसभा संघातील खारपाणपट्ट्यात गोड पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना नाइलाजाने खारेपाणी प्यावे लागत आहे. क्षारयुक्त खाऱ्या पाण्यामुळे ६९ गावांमधील नागरिकांना किडनीचे विकार जडले आहेत. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेल्हारा तालुक्यातील वान धरणातून ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी २२० कोटी रुपये मंजूर केले होते. आजरोजी पाणीपुरवठा योजनेचे ६० टक्के काम पूर्ण झाले असताना जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिली. 

ही स्थगिती उठविण्यासाठी आमदार नितीन देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय आमरण उपोषण छेडले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याआधी पाणीपुरवठा योजनेची स्थगिती उठविणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणीस यांनी दिले होते; परंतु अधिवेशन संपल्यानंतरही स्थगिती न हटविल्यामुळे अखेर आमदार देशमुख यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याचे समोर आले आहे. ६९ गावांमधील नागरिक व शिवसैनिकांसह त्यांनी सोमवारी सकाळी आराध्य दैवत श्री राजेश्वराचे दर्शन घेऊन अकोला ते नागपूर पायदळ मोर्चाला प्रारंभ केला.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, मुकेश मुरूमकार, विकास पागृत, मंगेश काळे, योगेश्वर वानखडे, अतुल पवनीकर, संजय शेळके, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, रवी मुर्तडकर, गजानन मानतकर, अप्पू तिडके, ज्ञानेश्वर गावंडे, नितीन ताथोड, ब्रह्मा पांडे, अजय गावंडे, शहर प्रमुख राजेश मिश्रा (अकोला पश्चिम), शहर प्रमुख राहुल कराळे (अकोला पूर्व), विनायकराव गुल्हाने, आनंद बनचरे, निरंजन बंड, विवेक खारोडे, उमेश राऊत, ऍड. मनोज खंडारे, अमोल पालेकर, तरुण बगेरे, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, राजदीप टोहरे, सोनू भरकर, विजय परमार,  संजय अग्रवाल, गजानन चव्हाण, योगेश गीते, सागर भारूका, युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर, युवासेना शहर प्रमुख नितीन मिश्रा, किरण येलवनकर यांच्यासह असंख्य नागरिक मोर्चात सहभागी होते. 


टँकर मध्ये जमा केले खारेपाणी 
खारपाणपट्ट्यातील ६९ गावांमध्ये पिण्यासाठी गोड पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना देखील खाऱ्या पाण्याची चव समजण्यासाठी ६९ गावांतील नागरिकांनी जमा केलेले पाणी टँकरमध्ये भरण्यात आले आहे. 


पाणीपुरवठा योजनेला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी आम्ही अकोला ते नागपूर २४० किमीच्या प्रवासाला प्रारंभ केला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी खाऱ्या पाण्याची चव घेऊन स्थगिती हटवावी, अन्यथा त्यांची खाऱ्या पाण्याने आंघोळ घालणार. - आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख (ठाकरे गट)

Web Title: 69 Village Water Supply Schemes Shiv Sena foot march from Akola to Nagpur to lift moratorium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.